संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करीत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गुरू स्व.आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार आम्ही काम करतोय जेणेकरून सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला.
गुरूपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदे आधी मुंबईतील शिवाजी पार्क इथल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचे आणि नंतर ठाण्यातील आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळ येथील समाधीचे दर्शन घेऊन वंदन करून दोघांना अभिवादन केले.
टेंभी नाक्यावरील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमामध्ये ही शिंदे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्व.आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करीत नमन करून त्यांना अभिवादन केले. आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, डॉ. बालाजी किणीकर, रविंद्र फाटक, ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींसह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रसिद्धी आणि प्रसार माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गुरूपौर्णिमेनिमित्त आज शिवसेना प्रमुख बाळासेहब ठाकरे आणि वंदनीय स्व.आनंद दिघे या त्यांच्या दोन्ही गुरुवऱ्यांना त्यांनी वंदन केले. या दोघांची शिकवण आचरणात आणून सामान्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी स्व.आनंद दिघे यांना वंदन करण्यासाठी तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी रांगा लावून मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा स्विकार केला व त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.