संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्यातील हॉटेल व्यावसायिकांना पार्सल सेवा सुरू ठेवण्याची अनुमती दिली गेली असली तरी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतचे बहुतांश हॉटेल रात्रीच्या सुमारास छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे दिसून आले आहे. दिवसा पार्सल आणि रात्री ग्राहकांची झुंबड असे चित्र काही हॉटेलांमधून दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने कोरोना संक्रमण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. मुंबई व गुजरात राज्यामध्ये असलेल्या पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात एप्रिल महिन्यात सोळा हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दररोज ८०० ते ९०० रुग्ण वाढ होत होती. सध्या टाळेबंदीचा परिणाम होऊन रुग्णवाढ २०० ते २५० च्या जवळपास देऊन ठेपली आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ मोहिमे अंतर्गत राज्य सरकारने हॉटेल व्यावसायिकांना फक्त पार्सल सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे.
असे असतानाही महामार्गावरील काही हॉटेलचालक दिवसा पार्सल सुविधा आणि रात्रीच्या वेळी हॉटेल व मद्यविक्री सुरू ठेवत असल्याचे आढळून आले आहे. मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा पंधरा ते सतरा मोठी हॉटेल्स रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने सुरू असतात. या ठिकाणाहून दर तासाला पोलिसांचे गस्ती पथक फेरी मारत असले तरी आजवर कोणत्याही हॉटेल चालकावर कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. मनोरजवळील एका हॉटेल व्यावसायिकाचा अलीकडेच कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला असून परराज्यातील चालकांच्या खानपान सेवेत रुजू असलेल्या काही स्थानिक कामगारांना या आजाराचे नव्याने संसर्ग झाल्याची माहिती पुढे आली आहे.