मिलन शाह, मुंबई प्रतिनिधी: प्रसिद्ध संगीतकार नदीम-श्रवण यांच्यातील संगीतकार श्रवण कुमार राठोड (६७) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. मुंबईच्या रहेजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. श्रवण कुमार यांना करोनाची लागण झाल्याने सोमवारी रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर गुरूवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सोशल मीडियावर श्रवण यांच्या निधनाची बातमी दिली. अनिल यांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘फारच वेदनादायी अशी बातमी… प्रसिद्ध संगीतकार श्रवण कोविडमुळे आपल्याला सोडून गेले. ते माझे खूप चांगले मित्र होते. आम्ही ‘महाराजा’ मध्ये एकत्र काम केलं होतं. त्यांनी नेहमीच चांगलं संगीत दिलं. त्यांच्या कुटुंबियांना धैर्य मिळावं हीच प्रार्थना. श्रवण नेहमीच आमच्या हृदयात जिवंत राहतील.’
नव्वदच्या दशकात संगीत जगतावर नदीम- श्रवण यांच्या जोडीचे वर्चस्व राहिले. त्यांच्या ‘आशिकी’ चित्रपटातील सर्व गाणी खूप लोकप्रिय झाली होती. या दोघांनी साजन, साथ, दीवाना, फूल और कॉंटे, राजा, धडक, दिलवाले, राज, राजा हिंदुस्तानी, दिल है मानता नहीं, सारी अशा चित्रपटांमध्ये संगीतकार म्हणून काम केले होते.