संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र बुधवारी पहाटे त्यांचं निधन झालं.
दिलीपकुमार यांनी बॉम्बे टॉकिजनं १९४४ साली निर्माण केलेल्या ज्वार भाटा या सिनेमातून हिंदी सिनेमात पदार्पण केलं. तर १९९८ ला आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.
अंदाज, आण, दाग, देवदास, आझाद, मुघल ए आझम, गंगा जमूना, राम और शाम, क्रांती, शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर असे काही सुपरहिट सिनेमे दिलीपकुमार यांच्या नावावर आहेत.
अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर देशातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलीप कुमार यांच्या परिवाराच्या प्रति सांत्वना व्यक्त केल्या आहेत तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलीप कुमार यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात केला जाईल अशी माहिती दिली आहे.