प्रतिनिधी: अवधुत सावंत
कल्याण-भिवंडी मार्गावर राजणोली नाका बायपास येथील ‘टाटा आमंत्रा कोविड सेंटर’ मधून दोन कैदी पसार झाल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी या कोविड सेंटरमध्ये दाखल केले होते.
याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी शोध सुरू केला आहे. गाजीदारा जाफरी (वय २५) खुर्शीद अब्दुल हमिद शेख (वय ३३) असे फरार झालेल्या अट्टल कैद्यांचे नावे आहेत. या प्रकरणी बातमी येताच याठिकाणी तैनात करण्यात आलेल्या ४ पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
कल्याणच्या आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या ३० कैद्यांना काही दिवसापूर्वीच कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक व खळबळजनक घटना समोर आली होती. कोरोनाबाधित कैद्यांना उपचारासाठी ठाणे येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. गाजीदारा जाफरी आणि खुर्शीद या दोघांचाही कारागृहात शिक्षा भोगत असताना १९ एप्रिलला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या दोघांना उपचारासाठी कल्याण-भिवंडी मार्गावर राजणोली नाका बायपास येथील ‘टाटा आमंत्रा कोविड सेंटर’ च्या १५ व्या मजल्यावर उपचारासाठी दाखल केले. या गोष्टीचा फायदा घेत दोघांनी १५ व्या मजल्यावरील बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढल्या आणि पाईपवरून खाली येत पळ काढला. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी या फरार कैद्यांचा शोध सुरू केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने करत आहेत.