संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
भाजप नेत्या प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे प्रीतम मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावरून शिवसेनेने भाजपवर टीका करण्याची संधी साधली आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने पंकजा यांचे पंख छाटले. एकनाथ खडसे यांना बाद केले, असं सांगतानाच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे नेते होते त्यांना राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम फडणवीसांनी केल्याची टीका शिवसेनेचे खा.विनायक राऊत यांनी केली आहे.
खासदार विनायक राऊत यांनी भाजपमधील धुसफुशीवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे नेते होते त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला. ओबीसी समाजाला आणि मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांचा आधारवड म्हणून मुंडे कुटुंबीयांकडे पाहिले जाते. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे त्याच ताकदीने या वर्गाला न्याय देण्याचे काम करत आहेत. दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पंकजा यांचे पंख पूर्णपणे छाटून टाकले आहेत. त्याचबरोबर पक्षातलेच एकनाथ खडसे यांना बाद करून टाकलं आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे होते, त्या सर्वांना फडणवीसांच्या माध्यमातून राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम झालं. आजही भाजपने पंकजा मुंडेना राजकारण आणि समाजकारणाच्या बाहेर फेकून दिलं आहे, असा सणसणीत टोला ही त्यांनी लगावला आहे.
भाजपाने शिवसेनेला टक्कर देण्यासाठी नारायण राणे यांना मंत्रीपद दिलं असेल तर तो त्यांचा भ्रमनिरास असेल. नारायण राणे यापूर्वी मंत्री असताना देखील खुद्द त्यांना सिंधुदुर्गात पराभव चाखावा लागला आहे. त्यामुळे शिवसेनेचा जो हिसका आहे, त्याचा अनुभव राणेंनी घेतलेला आहे, असं सांगतानाच मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपाला मुंबईत राणेंकडून काही फायदा होणार नाही. मागच्या ३० वर्षांपासून मुंबईत शिवसेना जे काम करते आहे, त्या विश्वासावर पुनश्च एकदा शिवसेना आणि महाविकास आघाडी २०२४ मध्ये मुंबई महापालिकेवर भगवा फडकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.