संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
प्रेयसीला प्रभावित करण्यासाठी प्रियकराने व्हॉट्सअॅपवर खास महागड्या गिफ्टस्चे स्टेटस ठेवले होते. विशेष म्हणजे, चोरीच्या रक्कमेतून प्रेयसीला महागड्या भेटवस्तू देऊन त्याचे फोटो व्हॉट्सअॅपच्या स्टेटसवर ठेवल्याने चोरटा प्रियकर सहजरित्या अंबरनाथ पोलीसांच्या तावडीत अडकला आहे. राज आंबवले असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव असून आरोपीने गुन्हा कबूल करताच त्याला अटक करून २ सप्टेंबरला न्यायालयात हजर करण्यात आले आहे व न्यायालयाने आरोपीस ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपीला मालकाने कामावरून काढलं होते
अंबरनाथ पश्चिम भागातल्या रेल्वे स्थानकानजीक सुनील महाडिक यांच्या मालकीचे ‘ओम श्री साईराम’ नावाने पूजेचे साहित्य विक्रीचे दुकान आहे. या दुकानात आरोपी राज आंबवले कामाला होता. मात्र काही महिन्यापूर्वी त्याने पैश्याची अफरातफर केल्याने त्याला सुनील महाडिक यांनी कामावरून काढून टाकले होते. त्यातच २४ ऑगस्ट रोजी सुनील महाडिक यांनी घाऊक विक्रेत्याकडून पूजेचे साहित्य घेतले होते. त्याच विक्रेत्याला देण्यासाठी रोकड दुकानाच्या गल्ल्यात ठेवली होती. मात्र त्या दिवशी घाऊक विक्रेता रोकड घेण्यासाठी आला नसल्याने सुनील महाडिक रोकड गल्ल्यात ठेवून घरी गेले. मात्र २५ ऑगस्ट रोजी दुकानात आले असता त्यांच्या दुकानाची ग्रील कापलेली आणि कुलूप तोडलेल्या अवस्थेत त्यांना आढळून आले. तर गल्ल्याची चावीने उघडून त्यामधील दोन लाख रोकड शिवाय एक सोन्याची चेन चोरून नेल्याचे त्यांना आढळले. त्यानंतर महाडिक यांनी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात रोकड व सोनसाखळी चोरीला गेल्याची अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दिली.
गल्ल्याची चावी कुठे ठेवायचे, हे केवळ आरोपीलाच माहीत
दुकान मालक सुनील महाडिक यांच्याकडे पूर्वी काम करणाऱ्या आरोपी राज आंबवले याने त्याच्या व्हॉट्सऍप स्टेटसवर गर्लफ्रेंडला नवीन महागडा आयफोनसह नवीन ऍक्टिव्हा घेतल्याचे तीन-चार दिवसापूर्वीचे फोटो स्टेटसवर अपलोड केले होते. त्यानंतर महाडिक यांनी राज याच्या मोबाईलमधील स्टेटस पाहताच महाडिक यांना संशय आला. विशेष म्हणजे सुनील महाडिक यांच्या दुकानाच्या गल्ला चावीने उघडून चोरी झाली. आणि मालक गल्ल्याची चावी कुठे ठेवायचे, हे केवळ आरोपी राज आंबवले यालाच माहीत होते. त्यामुळे महाडिक यांनी अंबरनाथ पोलीसांकडे याबाबतचा संशय व्यक्त करताच पोलीसांनी राज आंबवले याला अंबरनाथ मधून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, मालकाने कामावरून काढल्याचा राग मनात धरून आणि प्रेयसीला महागडा फोन, दुचाकी भेटवस्तू देण्यासाठी चोरी केल्याची कबुली त्याने अंबरनाथ पोलीसांनी दिली आहे. गुन्हा कबूल करताच राज अंबावले याला अटक करून २ सप्टेंबरला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ सप्टेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे.