संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांसाठी ‘नोव्हेलस् एन.आय.बी.आर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’ निगडी, येथे खानपान सेवा व्यवस्थापन आणि शिष्टाचार ह्या विषयी तीन दिवसांची कार्यशाळा आयोजित करून विशेष प्रशिक्षण दिले गेले, कोविड महामारीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना गेले दीड वर्ष सर्वतोपरिने अहोरात्र मदत करणाऱ्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना मोफत प्रशिक्षण देऊन ‘नोव्हेल’ने अभिनव पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली.
पंचतारांकित हॉटेल्समधील प्रमाणांनुसार, पोलीस आयुक्तालयात आलेल्या अतिथिंचे आदरातिथ्य कसे करावे आणि खानपान सेवा पुरवताना कोणते शिष्टाचार पाळण्यात यावेत याबद्दल सहभागी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. उत्साही आणि जिज्ञासू कर्मचाऱ्यांनी ही कार्यशाळा उत्तमरीत्या पुर्ण केली. मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग करून हे कर्मचारी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील अतिथी सेवेला वेगळ्या उंचीवर नेतील अशी अपेक्षा आहे.
कार्यशाळेच्या अंतिम सत्रात, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. कृष्ण प्रकाश, नोव्हेल ग्रूपचे संस्थापक-अध्यक्ष श्री. अमित गोरखे आणि प्राचार्य श्री. वैभव फंड ह्यांनी प्रशिक्षनार्थिंचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला.
याप्रसंगी श्री. कृष्ण प्रकाश यांनी आपल्या भाषणात प्रशिक्षण यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल ‘नोव्हेल कॉलेज’चे अभिनंदन केले. अशा कार्यशाळा कर्मचाऱ्यांच्या बहुअंगी विकासाकरता अतिशय उपयुक्त असून, मनोबल वाढविण्यास पूरक ठरतात असे मत त्यांनी मांडले. संस्थेच्या कामावर विश्वास ठेऊन प्रशिक्षणाची जबाबदारी ‘नोव्हेल’ला दिल्याबद्दल पोलीस आयुक्तांचे आभार मानून भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे एकत्रित काम करण्याचा आशावाद श्री. अमित गोरखे यांनी व्यक्त केला. कार्यशाळेच्या माध्यमातून कोविड योध्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली याबद्दल प्राचार्य श्री. वैभव फंड यांनी आनंद व्यक्त केला व प्रशिक्षणार्थींची जिज्ञासू वृत्ती, सृजनशीलता आणि तत्परता ह्या गुणांचे कौतुक केले.
प्रशिक्षणाची संकल्पना पोलिस उपायुक्त मा. श्री. सुधीर हिरेमठ यांची होती तर आयोजनात सहा. सह आयुक्त श्री. नंदकुमार पिंजन यांनी मोलाची भूमिका बजावली. प्रशिक्षण देण्याची जबाबदारी प्रा. शंतनु देशपांडे यांनी प्रा. यशवंत सटानकर, प्रा. सतीष ब्राम्हणे व नोव्हेल कर्मचारी वृंदाच्या मदतीने पार पाडली.