संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
नारायण राणेंच्या समर्थनार्थ भाजपाचे शिर्डीत आंदोलन
राज्यात शिवसेनेचे स्वतःला मोठे नेते समजणारे काही, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राज्याचे विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या स्तरावर जावून टिका टिप्पणी करतात. मात्र ‘भारतीय जनता पक्ष’ कधीच अशा प्रकारे कारवाईचा बडगा दाखवत नाही. आता आम्हाला देखील जून्या रेकॉर्डिंग काढून पुरावे सादर करावे लागतील. तेव्हा पोलीस प्रशासन अशा नेत्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार का ? असा सवाल शिर्डीचे आमदार तथा भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या समर्थनार्थ पुकारलेल्या आंदोलनाच्या वेळी उपस्थित केला.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सवी वर्ष’ की ‘हिरक महोत्सव’ हेच माहीत नसावं ही शोकांतिका असून यावर भाष्य करतांना नारायण राणे बोलले. मात्र सर्वात आधी मुख्यमंत्र्यांनीच माफी मागणे अपेक्षित आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष झालीत हेच जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच माहीत नसेल तर प्रथम त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला पाहीजे अशी मागणी विखे पाटील यांनी यावेळी बोलताना केली.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सवी वर्ष’ असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी ‘हिरक महोत्सव’ हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना ‘अमृत महोत्सव’ असल्याचं सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज ७४ वर्षे पूर्ण करुन ७५ व्या वर्षात हिरक महोत्सवी… नाही अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुनच केंद्रीय मंत्रो नारायण राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखालीच लगावली असती, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.
भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत केलेल्या विधाना नंतर राज्यात याचे पडसाद उमटून आले. यानंतर केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली. तर त्याच बरोबर रात्री उशिरा जामीन मंजूर झाला. नारायण राणे यांच्या अटकेनंतर भारतीय जनता पक्ष ऍक्शन मोडवर आला. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यभर आंदोलन छेडणाचा ईशारा दिल्यानं शिर्डीत भारतीय जनता पार्टीचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वावाखाली आंदोलन करण्यात आले.
शिर्डीतील प्रांतअधिकारी कार्यलयासमोर राधाकृष्ण विखे पाटलांसह भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, नगरसेवक रविंद्र गोंदकर, रविंद्र कोते, ज्ञानेश्वर गोंदकर यांच्या उपस्थित महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ठाकरे सरकारने राज्यात राजकीय दहशतवाद सुरु केला असून पोलीस प्रशासनाचा चुकीचा वापर करत खोटे गुन्हे दाखल करत आहे. राजकीय सूडबुद्धीने कारवाई करत असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी तसेच या घटनेची चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन शिर्डी प्रांतअधिकारी गोंविद शिंदे यांना देण्यात आले.