संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
मोटार सायकल चोरी करणाऱ्यास डोंबिवली पोलीसांनी अटक करून एकूण २,७९,०००/- रुपये किंमतीच्या ४ मोटार सायकल हस्तगत करून, ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादी तरुण करण किशोर सागवेकर (वय: १८ वर्षे) व्यवसाय: नोकरी, राहणार खोली क्र.५, शिव अमृत चाळ, ‘ए’/विंग डोंबिवली पश्चिम याची इंस्टाग्रामवर ओळख झालेला व्यक्ती नामे अनिकेत वाडकर याने त्याला भेटायचे आहे असे सांगून करण सागवेकर याला ठाकुर्ली रेल्वे स्टेशन जवळ, डोंबिवली (पूर्व) येथे भेटून करण सागवेकर याच्याकडे असलेली नवीन मोटार सायकल ही कशी चालते हे पाहण्यासाठी घेऊन गेला तो परतलाच नसल्याने याबाबत रामनगर येथील डोंबिवली पोलीस ठाण्यात फिर्यादी करण सागवेकर याने दिलेल्या तक्रारीवरुन डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर इसमास कल्याण (पश्चिम) परिसरातून अटक केली. त्याचेकडे केलेल्या चौकशीत त्याने कोपरी- ठाणे, कोलशेत-ठाणे, मानपाडा-डोंबिवली व ठाकुर्ली-डोंबिवली परीसरात मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले. दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून ४ मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -३ कल्याण सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, सुनिल कुराडे (डोंबिवली विभाग), वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पोनि. सरडे, पोनि. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि. योगेश सानप, सपोनि. बळवंत भराडे, पोहवा. विशाल वाघ, पोहवा. शंकर निवळे, पोहवा. प्रशांत सरनाईक, पोहवा. भणगे, पोना. कोळेकर, पोना. दिलीप कोती. नितीन सांगळे, शिवाजी राठोड, निलेश पाटील यांनी केली. दरम्यान, गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. योगेश सानप करत आहेत.