संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्य सरकारच्या निर्णयानुसार मुंबई महापालिकेनेही मराठी पाट्यांच्या नियमांची अंमलबजावणी होण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. त्याकडे कानाडोळा करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. तत्पूर्वी, मुंबई महापालिकेमार्फत मुंबईतील नेमक्या किती दुकाने, आस्थापनांनी त्याचे पालन केले आहे, हे तपासले जाणार आहे. त्यानंतर त्यांना नोटीस दिल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२२ तील कलम ३६ ‘क’ (१) च्या कलम ६अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनास कलम ७ नुसार ‘मराठी भाषेतून नामफलक लावणे’ बंधनकारक आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मराठी पाट्यांविषयी आदेश जारी केल्यानंतर पालिकेनेही त्यासाठी धोरण आखले आहे.
मुंबईत सुमारे पाच लाख दुकाने आणि आस्थापना असून, त्यापैकी केवळ अडीच लाख दुकानांनी मराठी पाट्या लावण्याच्या नियमांची पूर्तता केली आहे. उर्वरित अडीच लाख दुकानांनी याबाबत हलगर्जीपणा दाखविल्याने पालिकेनेही कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी पाट्या अनिवार्य करताना पालिकेने ३० जूनची मुदत दिली होती. त्यानंतर व्यापारी संघटनांच्या विनंतीवरून ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र ही तारीख उलटून गेल्यानंतरही पाच लाख दुकानांपैकी ५० टक्के म्हणजे अडीच लाख दुकानांनी त्याची अंमलबजावणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच मराठी पाट्या प्रकरणी व्यापारी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. अशा परीस्थितीत मराठी पाट्यांचे नियम पालिकेच्या माध्यमातून कसे राबवले जातील, याकडे लक्ष दिले जात असल्याचे उपायुक्त संजोग कबरे यांनी सांगितले.