संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्यात एकनाथ शिंदे गट व उद्धव ठाकरे यांचे समर्थक इतर वेळी एकमेकांवर टीका करत असतात परंतु अनंतचतुर्दशी दिनी थेट गणेश विसर्जन मिरवणुकीत देखील परस्पर विरोधाचे बोलके चित्र बघायला मिळाले. मुंबईतील प्रभादेवी परिसरात गणरायाचे विसर्जन करत असताना दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांच्या मिरवणुकी आमनेसामने आल्याने घोषणाबाजी, कल्लोळ यासह काही काळ तणावपूर्ण वातावरणाची निर्मिती झाली होती. यावेळी समाधान सरवणकर व संजय भगत हे प्रमुख कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने जोरदार घोषणाबाजी होऊन राडा सदृश्य स्थिती निर्माण झाली होती.
यावेळी पोलीसांनी प्रसंगावधान दाखवत मध्यस्थी केल्याने दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत करण्यात आले व कुठलाही अनुचित प्रकार रोखण्यास पोलीसांना यश प्राप्त झाले. प्रभादेवी भागात यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले होते तसेच शिंदे गटाच्या प्रियाताई सरवणकर यांनी मध्यस्थी केल्याने विसर्जनाला गालबोट लागण्याचा प्रकार टाळला गेला. या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती घेतली व पोलीसांना योग्य ते उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.
पोलीसांच्या हस्तक्षेपाने लवकरच वातावरण निवळले व विसर्जन शांततेत पार पडले. एकंदरतीच राजकीय विरोध हा सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमात देखील दिसून येत असल्याने लाडक्या बाप्पाच्या विसर्जनावेळी तरी शांतता राखणे गरजेचे होते. येत्या काळात नवरात्र उत्सव आहे त्यामुळे सामंजस्याने वागत विरोध बाजूला ठेवत सण उत्सव साजरे व्हावे अशा प्रतिक्रिया सामान्य लोकांतून येत आहे.