Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या महाराष्ट्र

३०० पोलीस कोरोना ‘सुपर सेव्हर’ समूहात

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाबाधितांच्या उपचार मोहिमेत पोलिसांचाही सहभाग

मुंबईत राष्ट्रीय जनआरोग्य प्रशिक्षण आणि अनुसंधान संस्थेने कोरोनाबधितांना त्वरित उपचार, सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने ‘सुपर सेव्हर’ समूह तयार करण्याची योजना आखली असून त्यात पोलीस दलासही सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई पोलीस दलातील ३०० अधिकारी अंमलदारांची ‘सुपर सेव्हर’ समूहात निवड केली जाणार आहे. ‘सुपर सेव्हर’ समूह कोरोना उपचार केंद्र आणि बाधित त्यांच्यातील दुवा किंवा पूरक जबाबदारी पार पाडेल. चाचणीतून कोरोना बाधितांचे निदान झाल्यानंतर अनेक रुग्णांना रुग्णालयात किंवा कोरोना उपचार केंद्रात बेड्स मिळत नाही. अनेकांना घर ते रुग्णालयापर्यंत रुग्णवाहिका किंवा पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होत नाही. काहींना प्राणवायू, कृत्रिम श्वसन यंत्रणेची आवश्यकता असते. अशावेळी बाधितास उपचार मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे संसर्ग पसरून रुग्णाच्या जीवावर बेतते आणि वैद्यकीय यंत्रणेवरही ताण येतो. निदान झाल्यापासून उपचारांस सुरुवात होण्यापर्यंतच्या काळात (गोल्डन अवर) ‘सुपर सेव्हर’ समूह रुग्णांना आवश्यक ती मदत पुरवणार आहेत.

रुग्णवाहिकेस विलंब होत असल्यास पर्यायी व्यवस्था उभी करून त्याआधारे बाधितास रुग्णालयात नेणे, बेड उपलब्ध करून देणे, रुग्णालयातील उपचार आवश्यक नसलेल्या बाधितांना विलगीकरणात दाखल करणे ही सुपर सेव्हर समूहाची प्रमुख जबाबदारी असेल. जनआरोग्य प्रशिक्षण, अनुसंधान संस्थेने अशा समूहांत पोलिसांनाही सहभागी करून घ्यावे, अशी सूचना केली आहे. त्यादृष्टीने मुंबई पोलीस दलाने ३०० अधिकारी, अंमलदारांची निवड सुरू केली असून लवकरच त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाईल, असे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *