महाराष्ट्रद्रोही राज्यपाल कोश्यारी यांना केंद्र सरकारने परत बोलवावे! – काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस
संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी: मिलन शाह
मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई बद्दल केलेले वक्तव्य महाराष्ट्र व मराठी माणसाचा अपमान करणारे आहे. संवैधानिक पदावरील व्यक्तीने अशी विधाने करू नयेत असे संकेत व परंपरा आहे पण हे महाशय राज्यपाल नसून भाज्यपाल आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. कोश्यारी यांचे मुंबईबद्दलचे वक्तव्य चीड आणणारे आहे. त्यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो व महामहिम राष्ट्रपती यांनी कोश्यारी यांना परत बोलवावे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महाराष्ट्र विरोधी वक्तव्ये केली आहेत. महापुरुषांच्या बाबतीतही कोश्यारी यांनी अवमानकारक वक्तव्ये केली आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलही कोश्यारी यांनी बडबड करून महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला आहे. आज पुन्हा त्यांनी मुंबई बद्दल बोलून मर्यादांचे उल्लंघन केले आहे. मुंबईच्या जडणघडणीत मराठी माणसाचाच मोठा वाटा आहे पण मराठी माणसाचे योगदान नाकारून राज्यपाल कोश्यारी यांनी नाहक वाद निर्माण केला आहे.
कोश्यारी यांचे वक्तव्य मुंबई व मराठी माणसाबद्दलचा त्यांचा द्वेष व्यक्त करणारे आहे. या वक्तव्याबद्दल राज्यपाल यांनी मुंबई व मराठी माणसाची माफी मागितली पाहिजे.
भारतीय जनता पक्ष नेहमीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बाजू घेत असतो. मुंबई बद्दलचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वक्तव्य भाजपाला मान्य आहे का? याचा त्यांनी खुलासा करावा आणि त्यांचे वक्तव्य चुकीचे आहे असे वाटत असेल तर कोश्यारी यांचा भाजपाने निषेध करून त्यांना परत पाठवण्याची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी करावी, असेही राजहंस म्हणाले.