Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

पंख्यात अडकून तुटलेले 20 महिन्याच्या बाळाचे बोट पुन्हा जोडण्यात वोक्हार्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांना आले यश!

मुंबई, प्रतिनिधी: प्लास्टिक सर्जरीद्वारे 20 महिन्यांच्या बाळाच्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या बाजूचे तुटलेले बोट पुन्हा जोडण्यात मिरारोड येथील वोक्हार्ट हाँस्पिटलचे डॉ. सुशील नेहते, सल्लागार प्लास्टिक हँड अँड मायक्रोसर्जन आणि डॉ. प्रताप नाडर, सल्लागार प्लास्टिक रिकन्स्ट्रक्शन अँड एस्थेटिक सर्जन यांना यश आले आहे.

घरामध्ये खेळत असताना चालू असलेल्या टेबल फॅनमध्ये हात घातल्यामुळे एका 20 महिन्यांच्या बाळाच्या उजव्या हाताचे बोट कापले गेले. मुलाच्या पालकांनी हे कापलेले बोट उचलून स्वच्छ रुमालात गुंडाळले आणि नंतर प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले. मुलाची प्रकृती खालावल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्याला तात्काळ मिरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल केले.

डॉ. प्रताप नाडर, सल्लागार प्लॅस्टिक रिकन्स्ट्रक्टीव्ह अँड एस्थेटिक सर्जन, वोक्हार्ट हॉस्पिटल, मीरारोड सांगतात की, बाळाला आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात आणण्यात आले. त्याच्या उजव्या हाताच्या बोटातून रक्त येत होते. अशा परिस्थितीत मुलावर तातडीने उपचार करणे आवश्यक होते. पालकांच्या संमतीने मुलाची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेद्वारे मुलाचे कापलेले बोट पुन्हा जोडण्यात आले. ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुमारे 3 तास चालली. शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसांनी रुग्णाला घरी सोडण्यात आले. आता हे मुल या बोटाचा वापर खाणे, वस्तू उचलणे, वस्तू ठेवणे अशा सर्व कामांसाठी करु शकतो.

डॉ. सुशील नेहेते, सल्लागार प्लास्टिक, हँड अँड मायक्रोसर्जन, वोक्हार्ट हॉस्पिटल सांगतात की, लहान मुलांमध्ये इम्प्लांट शस्त्रक्रिया करणे खूप आव्हानात्मक असते. अनेक वेळा मुले खेळत असताना अशा दुर्घटना घडतात. अशा आपत्कालीन परिस्थितीत काय करावे ते याबाबतीत पालकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे.

जसे की, विच्छेदन केलेला भाग पुन्हा जोडण्यासाठी ताबडतोब रुग्णालयात आणणे आवश्यक, विच्छेदन केलेला भाग रुमाल किंवा सुती कपड्यात गुंडाळलेला असावा आणि तो प्लास्टिकच्या पिशवीत, बर्फाच्या पॅकवर, आणि कंटेनरमध्ये ठेवावा. उघड्या हातांनी त्या भागाला स्पर्श करू नये. वेळीच उपचार केले तर कापले गेलेले अवयव पुन्हा जोडले जाऊ शकते. या मुलाला वेळीच हॉस्पिटलमध्ये आणले होते त्यामुळे आम्ही त्याचे बोट वाचवू शकलो. हॉस्पिटलने त्याच्यावर तातडीने उपचार केले नसते तर त्याचे बोट गमावले असते. अशा घटनांपासून मुलांना वाचवण्यासाठी पालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

या घटनेविषयी बोलताना बाळाचे पालक सांगतात की, “बाळाचे बोट कापलेले पाहून आम्ही खूप घाबरलो होतो. आमचे बाळ खूप रडत होते. आम्हाला वाटले की आता हे बोट पुन्हा जोडणे शक्य नाही. पण आम्ही कापलेले बोट घेऊन वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. वोक्हार्ट रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने प्रसंगावधान राखून तुटलेले बोट पुन्हा जोडले. माझ्या मुलाला नवीन जीवन दिल्याबद्दल आम्ही डॉक्टरांचे आभार मानतो”

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *