संपादक: मोईन सय्यद / मुंबई प्रतिनिधी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात अक्षरश: हाहाकार उडवला. अशावेळी आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला असून यापुढे महाराष्ट्रात होम आयसोलेशन बंद म्हणजेच गृह विलगीकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये सरासरी पॉझिटिव्हिटी रेट हा इतर राज्यापेक्षा जास्त आहे तिथे होम आयसोलेशन हे शंभर टक्के बंद करण्यात आलं आहे. याबाबतचा निर्णय आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज जाहीर केला आहे.
या निर्णयाचा असा अर्थ आहे की, आता यापुढे एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आणि त्याला जरी लक्षणं नसली तरीही त्याला कोव्हिड केअर सेंटरमध्येच राहावं लागणार आहे.
आजच्या 18 जिल्ह्यांच्या ज्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा राज्यापेक्षा जास्त आहे सरासरीपेक्षा, त्या जिल्ह्यांच्या बैठकीत दोन महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. एक म्हणजे होम आयसोलेशन हे शंभर टक्के बंद करा आणि कोव्हिड केअर सेंटरची संख्या वाढवा. सगळ्या लोकांना तिथे आयसोलेट करा.’ असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता गावागावांमध्ये कोव्हिड केअर सेंटर वाढविण्याचे निर्देश हे केंद्र सरकारनेसुद्धा दिलेल्या आहेत. म्हणून त्यासाठी वित्त मंत्रालयाच्या माध्यमातूनसुद्धा १५ व्या वित्त आयोगाची जो निधी ग्रामीण ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेमध्ये उपलब्ध आहे त्यातून २५ टक्के खर्च हा कोव्हिड केअर सेंटर उभा करण्यासाठी म्हणजे २५ ते ३० बेड निर्माण करण्यासाठी खर्च करता येतील. ही महत्त्वाची सूचना या निमित्ताने देण्यात आली आहे.’ असं राजेश टोपे म्हणाले.
राज्य शासनाच्या आदेशानुसार सध्या महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, यवतमाळ, अमरावती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, बुलढाणा, वाशीम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.