संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
दसरा मेळाव्याची सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा परंपरेनुसार शिवाजी पार्कवरच होणार तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे यांची दसरा सभा होणार आहे. या दसरा मेळाव्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या मेळाव्यांमध्ये विरोधी गटांवर कोणते आणि कसे आरोप केले जातील, याची सर्वच चर्चा करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
“उद्धव ठाकरे यांची जी सभा होणार आहे किंवा यापूर्वी ज्या सभा झाल्या त्या टोमणे सभा झाल्या. महाराष्ट्राच्या हिताबद्दल ते कधीच काही बोलले नाहीत. पुन्हा एकदा टिंगलटवाळी सभा होणार आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे असे कार्यकर्ते आहेत जे दिवसाचे १८ तास समर्पित आहेत. हे दोघेही नेहमीच विकासाचा विचार करतात. दसरा मेळाव्यात काय अपेक्षित आहे तर, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल ? महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर कसा पोहोचेल ? हेच अपेक्षित आहे. पण सेनेकडून आजपर्यंत दसरा मेळाव्यात फक्त टोमणे मारले गेले, टोमणे सभांनी महाराष्ट्राचं भलं होणार नाही.” असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही जोडी जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहे. विकासासाठी काम करणारं हे नव सरकार आलं आहे. ट्वेंटीट्वेंटी मॅच खेळणारं हे सरकार आहे. हे दोघेही सुपरमॅन आहेत, बुलेट ट्रेन सुसाट सुरू आहे. मी कधीही एकनाथ शिंदेंना पाहतो तर ते विकासाबाबतच बोलत असतात, महाराष्ट्राला क्रमांक एकवर कसं नेता येईल याबाबत बोलत असतात. उद्धव ठाकरेंची सभा ही टोमणे सभाच असणार आहे, असेही बावनकुळे म्हणाले.