संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी:अवधुत सावंत
थोडक्यात हकीगत अशी की यातील आरोपीत याने फिर्यादीशी ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या वेबसाईट वर ऑनलाईन रेजिस्ट्रेशनद्वारे खोट्या नावाने ओळख करून माहे जुलै २०२० ते दिनांक १५ जानेवारी २०२१ पावेतो फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन करून फिर्यादीचे राहते घरी जाऊन अनैतिक शारीरिक संबंध ठेवला. तसेच फिर्यादी यांच्याकडून १० तोळे ५ ग्राम सोन्याचे दागिने घेऊन जाऊन अपहार केला. त्याचप्रमाणे यातील तीन महिला साक्षीदार यांच्याशी देखील लग्न करणार आहे असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून ४ तोळे सोने व साडेसहा लाख रुपये इत्यादी घेऊन अपहार करून त्यांची फसवणूक केली म्हणून विष्णूनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नंबर ७८/२०२१ भ.द.वि.क ३७६, ४२०, ४१७, ४०६ अन्वये दिनांक.१६/०४/२०२१ रोजी दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा महिला अत्याचाराचा असल्याने श्री.दत्ता कराळे सो, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण, श्री.विवेक पानसरे सो, पोलीस उपायुक्त परिमंडल-३ कल्याण व मा. सहा पोलीस आयुक्त श्री.जयराम मोरे सो, डोंबिवली विभाग यांनी विशेष प्रयत्न करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या होत्या.
सदर गुन्ह्यातील आरोपीत हा आपले नाव बदलून, आपल्या राहण्याची जागा नेहमी बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. विष्णूनगर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी श्री.गणेश वडणे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि गुप्त बातमीदार यांच्या आधारे आरोपीत नामे शैलेश प्रभाकर बांबार्डेकर उर्फ प्रथम चंद्रकांत माने (वय ३५ वर्षे) राहणार ए/१०६, जीवदानी प्लाझा, अमिनाबाई चाळ कंपाऊंड, मनवेल पाडा रोड विरार (पूर्व) यांस समतानगर कांदिवली, मुंबई येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता नमूद आरोपीत याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास नमूद गुन्ह्यात अटक केली असून तो सध्या न्यायालीन कोठडीत आहे.
अटक आरोपीत याच्याकडे पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान गुन्ह्या संबंधी चौकशी करता, त्याने फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडून घेतलेले १४० ग्राम वजनाचे दागिने (सोने) हस्तगत करण्यात आले आहे.
गुन्ह्याची पद्धत (Modus Operandi)
सदर गुन्ह्यातील आरोपी याने ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या मेट्रोमोनियल वेबसाईटवर प्रथम चंद्रकांत माने या खोट्या नावाने अकाउंट तयार करून त्यात स्वतःला उच्च शिक्षित असल्याचे भासवून ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या मेट्रोमोनियल वेबसाईटवर उच्च शिक्षित महिला व खास करून घटस्फोटित व विधवा महिलांशी ओळख करून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन करून त्यांच्या सोबत शारीरिक संबंध ठेवत असे, तसेच त्यांच्याकडून वैय्यक्तिक अडचण भासवून भावनिक जवळीक साधून पैशांची गरज असल्याचे सांगून सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन फसवणूक करत होता.
आरोपी याने या अगोदर सुद्धा अश्या प्रकारे गुन्हे केले आहेत किंवा कसे याबाबत तपास चालू असून आरोपीत याने प्रथम चंद्रकांत माने या नावाने ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या मेट्रोमोनियल वेबसाईटवर कोणाला फसवले असल्यास तात्काळ विष्णूनगर पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केलेले आहे याबाबत माहीती घेत आहोत. आरोपी यांच्यावर या अगोदर गुन्हे दाखल आहेत किंवा कसे याबाबत पुढील तपास चालू आहे.
सदरची कारवाई विष्णूनगर पोलीस ठाण्याचे मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.संजय साबळे, पोलीस निरीक्षक श्री. आर.एम.खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. योगिता पी.जाधव व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि. गणेश आर.वडणे, मपोना/८४४६ मिथिला मिसाळ, पोशि/६५०५ कुंदन भामरे, पोशि/७५९७ मनोज बडगुजर यांनी सदरची कारवाई यशस्वी रित्या पार पाडली आहे.