आपलं शहर

भाईंदर पूर्वेकडील नवघररोडवर ओमसाई गेस्ट हाऊसमध्ये लागली भीषण आग! अग्निशमन दलाने प्रसंगावधान राखून आटोक्यात आणली आग

भाईंदर, प्रतिनिधी : भाईंदर पूर्वेकडील नवघररोडवर असलेल्या भाजपचे माजी नगरसेवक यशवंत कांगणे यांच्या ओमसाई गेस्ट हाऊस या हॉटेलमध्ये काल रात्री उशिरा अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

आगीचे नेमके कारण अजून समजले नसले तरी विजेच्या तारेमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. भाजपच्या माजी नगरसेवकाच्या हॉटेलमध्ये लागलेल्या या आगीत हॉटेलचे किचनचे सामान, फर्निचर, फास्टफूडचे काउंटर, पानाची गादी, पार्टिशन, मुख्य प्रवेशद्वाराचे फर्निचर व इतर वस्तू असे एकूण अंदाजे 22 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज असून ह्या हॉटेलचे नूतनीकरण गेल्या काही महिन्यांपूर्वीच करण्यात आले होते. संपूर्ण हॉटेलचे बांधकाम दुरुस्ती करून त्याचे इंटेरिअरचे काम नवीनच करण्यात आले होते.

अग्निशमन दलाचे जवान वेळेवर पोहोचल्याने ओमसाई गेस्ट हाऊस लागलेली आग आटोक्यात येऊन परिसरातील इतर इमारतीना होणारा आगीचा धोका टळला. मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थानक अधिकारी सदानंद पाटील, बिट फायरमन विठ्ठल भाबल, संजय मोरे, वासुदेव भोईर सह इतर अग्निशमन जवानांनी आपले कर्तव्य बाजावत ही आग वेळेवरच आटोक्यात आणली.

भाईंदर पूर्वेला नवघररोडवर असलेले भाजपचे वादग्रस्त माजी नगरसेवक असलेले यशवंत कांगणे यांच्या मालकीचे असलेले हे ओमसाई गेस्ट हाऊस आधीपासूनच अनधिकृतपणे बनविण्यात आले असल्यामुळे वादग्रस्त ठरले होते आणि आता काही दिवसांपूर्वीच या होटेलची दुरुस्ती व नूतनीकरण करण्यात आले होते तरी देखील ही कशी आग लागली? किंवा ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आली? याबाबत तर्कवितर्क करण्यात येत आहेत. यात सत्य परिस्थिती काय आहे ते अग्निशमन दलाच्या चौकशी नंतर लवकरच स्पष्ट होणार आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *