संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
सिगारेट आणण्यासाठी उशीर झाला म्हणून अंगावर धावून गेलेल्या मित्राची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांगलीतल्या मिरजेमधील भोसे गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. इतकंच नव्हे तर हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन बोअरवेलमध्ये फेकण्यात आले होते.
यानंतर मित्रांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तपासादरम्यान उघड झालेल्या प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. २९ जुलैला पंढरपूर महामार्गावरील बंद कारखान्यात मित्रांनी दारु, अंडी पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी सागर सावंत आणि अमोल खामकर सिगारेट आणण्यासाठी गेले होते. दोघांनाही येण्यास उशिर झाल्याने दत्ता झांबरे त्यांच्या अंगावर गेला. यावेळी चिडलेल्या सागर सावंतने कोयत्याने दत्ता झांबरेवर वार केले. यावेळी अमोलने दगड घेऊन त्याच्या डोक्यात घातला. यानंतर दोघांनी मृतदेहाचे तुकडे केले आणि बोअरवेलमध्ये टाकले.
पीडित दत्ता झांबरे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. आरोपींनी पोलीस ठाण्यात दत्ता झांबरे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तपास केला असता हत्या झाल्याचं उघड झालं. पोलिसांनी सागर आणि अमोल या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अमोल करोनाबाधित असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान सध्या पोलिसांसमोर मृतदेहाचे तुकडे मिळण्याचं आव्हान आहे.