संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
महापालिका क्षेत्रात लोकसंख्येची जास्त घनता चाळ परिसर व झोपडपट्टी परिसरात आहे. या परिसरात राहणारे नागरिक प्रामुख्याने सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात आणि या सार्वजनिक शौचालयांमार्फत कुठल्याही संसर्गजन्य आजाराचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरीता चाळ/झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे शारीरिक स्वास्थ्य/आरोग्य सुरक्षित राहावे आणि त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेवर भर दिला असून महापालिकेच्या सर्व विभागिय उपायुक्तांना सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेची नियमित पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
महापालिकेच्या १० प्रभागात एकुण ४१९ शौचालयात ४२९२ सिटची सार्वजनिक शौचालय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. दलितवस्ती सुधारणे अंतर्गत अजून 38 शौचालय (एकुण २४९ सिट) उभारण्याचे काम सुरु असून त्यापैकी २८ शौचालयांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित १० शौचालयांची कामे प्रगतीपथावर आहेत. सार्वजनिक शौचालयाच्या दैनंदिन साफसफाईसाठी मे.जनसेवा सुविधा संस्था यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यामार्फत साफसफाई केली जाते. सदर संस्थेने प्रभागनिहाय शौचालयांची माहिती घेऊन शौचालयांच्या साध्यस्थितीबाबतचा अहवाल महापालिकेकडे सादर केला आहे. त्या अनुषंगाने नादुरुस्त शौचालयांच्या दुरुस्ती संदर्भातील निविदा काढण्यात आली असून सदर निविदा कार्यवाहीत आहे. महापालिका परिसरात ‘पे ॲण्ड युज’ ची एकुण २६ शौचालये (एकुण २३५ सिट) असून सदर शौचालयांच्या साफसफाईसाठी नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत तेथील दैनंदिन साफसफाई करण्यात येते.
विभागीय उपआयुक्तांनी केलेल्या शौचालयांच्या पाहणीच्या वेळेस आढळून आलेल्या अस्वच्छ शौचालयांची साफसफाई प्रभागातील आरोग्य निरीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्या देखरेखीखाली करुन घेण्यात येत आहे.