Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या

बनावट करारनामा करून ज्येष्ठ नागरिकाचा गाळा हडप करणाऱ्या सहा जणां विरुद्ध काशिमीरा पोलिसांनी केला गुन्हा दाखल!

संपादक: मोईन सय्यद/मिराभाईंदर प्रतिनिधी

मिरा भाईंदर: मुंबईत राहणाऱ्या एका ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा गाळा हडपण्यासाठी बळजबरी कब्जा करुन मृत व्यक्ती सोबतचा बनावट नोटरी करारनामा दाखवून पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने स्वतःच्या नावे कर आकारणी करून घेत ज्येष्ठ नागरिकालाच विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी ५ महिलांसह ६ जणां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राजेश कुमार सेठ (७४) रा. अंधेरी, लोखंडवाला यांच्या फिर्यादी नुसार, काशिमीरा महामार्ग लगत महाजनवाडी येथे त्यांची ११ गुंठे जमीन आहे. त्या ठिकाणी बॉसी बारच्या पुर्व दिशेला सर्विस रोड लगत त्यांचे २ गाळे असून कोरोना संसर्ग काळा पासून ते गाळे बंदच आहेत. गाळ्याची घरपट्टी, लाईटबील सेठ यांच्या नावे असुन, सदर गाळ्यास लोखंडी शटर व जाळी मारलेली आहे.

२३ डिसेम्बर २०२१ रोजी ते दोन्ही गाळ्यांची पाहणी करण्यास ते गेले असता एका बाजुने कोणीतरी गाळ्यांची भींत तोडुन त्यास दरवाजा बसवुन, गाळ्याचा कब्जा करून वापर करीत असल्याचे दिसले. त्यावेळी निलेश जतान्ना उर्फ अन्नु याने ही जागा आमची आहे, इकडे परत आलास अशी धमकी देवुन शिवीगाळी केली. दोन दिवसांनी सेठ यांनी गाळ्यात बांधलेला दरवाजा बांधकाम करुन बंद करून टाकला.

तेव्हापासुन निलेश याने त्याची आई शोभा जतान्ना व इतर ३ महीलांना गाळ्याच्या समोर बसवून ठेवले होते. २८ जानेवारी रोजी सेठ हे गाळ्याच्या ठिकाणी गेले असता निलेश, शोभा, पुनम जतान्ना व इतर ३ अनोळखी महिलांनी सेठ याना शिवीगाळ, दमदाटी करून तू परत आलास तर ब्लाउज फाडून तुझ्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करू असे धमकावले. त्यामुळे गाळा मालक सेठ घाबरून परत त्या ठिकाणी गेले नाहीत.

ही घटना घडल्या नंतर त्यांनी मिरा भाईंदर महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालय ६ मध्ये चौकशी केली असता, त्यांचे काका नरेश सेठ २००७ साली मृत झालेले असताना निलेशने नरेश यांचे सोबत २००८ साली नोटरी केलेला खरेदी करारनामा मालमत्ता कर आकारणी स्वतःच्या नावे करण्यासाठी सादर केल्याचे आढळून आले व त्या आधारावर निलेश ने गाळ्याला मालमत्ता कर स्वतः च्या नावाने लावून घेतला. या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी १६ मार्च रोजी निलेश, शोभा, पूनम व अन्य ३ महिलांच्या विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. तर संगनमत करून कर आकारणी करणाऱ्या मिरा भाईंदर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ह्या प्रकरणात एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सत्ताधारी नगरसेवक देखिल सामील असल्याचे बोलले जात आहे. आणि त्यामुळेच गाळा हडप करण्याचा या प्रकरणात अशा प्रकारे प्रभावशाली लोकांचा सहभाग आणि पाठिंबा असल्यामुळे या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे केला जाईल का? आणि पीडित ज्येष्ठ नागरिकाला न्याय मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *