संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
अंबरनाथ मध्ये रात्रीच्या वेळी नागरिकांच्या घरात घुसून मोबाईल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अंबरनाथच्या शिवाजी नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांना सध्या न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे.
अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा परिसरात सुनील सरोज हे त्यांच्या परिवारासह वास्तव्याला आहेत. १ एप्रिल रोजी त्यांच्याकडे नातेवाईक आले असल्यानं त्यांनी नातेवाईकांची सोय त्यांच्याच घराच्या वरच्या मजल्यावर रिकामी असलेल्या खोलीत केली. यानंतर पहाटेच्या सुमारास सरोज यांना वरच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा आवाज आल्याने त्यांनी वर जाऊन पाहिलं असता तिथे एक चोरटा सुनील यांच्या नातेवाईकांचे पैसे आणि मोबाईल चोरत असल्याचं आढळलं. त्यामुळं त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता हा चोरटा खाली असलेल्या त्याच्या एका साथीदाराच्या गाडीवर बसून पळून गेला.
या प्रकरणी सरोज यांनी अंबरनाथ मधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलीसांनी काही तासातच या दोन्ही चोरट्यांना बेड्या ठोकल्या. आसिफ मेहमूद खान आणि अक्षय उर्फ सुर्य मारी नायर अशी या दोघांची नावं आहेत. हे दोघेही उल्हासनगरला राहणारे असून त्यांचा यापूर्वीचा काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.