संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
लस उपलब्ध नसल्याने गेले पाच दिवस पहिल्या मात्रेसाठी डोंबिवली, कल्याण, नवी मुंबईत लसीकरण बंद होते. ते काही प्रमाणात लस उपलब्ध झाल्यानंतर दुपारनंतर सुरू झाले. मात्र ऐन वेळी लस आल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी केंद्रांवर मोठी गर्दी केली होती. पालिकेच्या २८ केंद्रांवर लस दिली जात होती. डोंबिवलीत लसी अभावी ४५ वरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू होती तर नवी मुंबईत १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे, मात्र ते फक्त एकाच केंद्रावर सुरू असल्याने अनेकांची निराशा झाली आहे.
दिवसभरात अनेकदा प्रयत्न करूनही लसीकरणाची तारीख व वेळ मिळत नसल्याने डोंबिवली व नवी मुंबईकर त्रस्त आहेत. त्यात शहरात लशींचा तुटवडा असल्याने मागील चार दिवस लसीचा पहिला डोस देणे बंद होते. पालिकेच्या वाशी, नेरुळ, ऐरोली येथील रुग्णालयात कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा दिली जात होती. पहिल्या मात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांना परत जावे लागत होते. महापालिकेला ५ हजार कोव्हॅक्सिन व ९ हजार कोव्हिशिल्डच्या लसकुप्या प्राप्त झाल्याने दुपारी १ नंतर लसीकरण सुरू झाले होते परंतु वाशी येथील कामगार विमा रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र मिळालेला लससाठाही कमी असल्याने लसीकरण किती दिवस सुरू राहील हे पालिका प्रशासनालाही सांगता येत नाही. लसीकरणाचे दैनंदिन चित्र बदलत असल्याने नागरिकांमध्ये अद्याप गोंधळ आहे.