भाईंदर, प्रतिनिधी : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचे रोज नवनवीन प्रकरणं बाहेर येत असून मिरा-भाईंदर महानगरपालिका आता महा भ्रष्टाचारी महानगरपालिका म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. या भ्रष्टाचारामध्ये महानगरपालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमीच आघाडीवर राहिलेला असून रस्त्याचे डांबरीकरण, गटारांचे-नाल्यांचे बांधकाम, फुटपाथ सुशोभीकरण, उद्यानाचे सुशोभीकरण काँक्रीटचे रस्ते, सौचालयांचे बांधकाम किंवा इतर कोणतेही बांधकाम असो बोट ठेवाल तिथे फक्त आणि फक्त भ्रष्टाचारच बाहेर पडत आहे.
गेल्या मार्च महिन्यांपासून संपूर्ण देशात कोरोना या भयंकर साथरोगामुळे लोकडाऊन केले गेले होते आणि देशात आणीबाणी सारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. अशा प्रसंगी देखील मीरा-भाईंदर महानगरपालीकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी “आपदा मी भी अवसर ढुंढिये” म्हणजेच “संकटात देखील संधी शोधा” या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या घोषवाक्याला जरा जास्तच मनावर घेऊन कोरोना काळात आलेल्या संकटाचे संधीत रूपांतर करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे.
अशाच प्रकारचा आणखीन एक नवा भ्रष्टाचार सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक श्रीप्रकाश जिलेदार सिंह उर्फ मुन्नासिंह यांनीच उघडकीस आणल्याने सत्ताधारी भाजपाची चांगलीच तारांबळ उडाली असून गेल्या अनेक वर्षांत सत्ताधारी पक्ष असून महापालिकेतील भ्रष्टाचार मात्र शिगेला पोहचला असल्याने शहरातील नागरिकां कडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
भारतीय जनता पक्षाचे भाईंदर पूर्वेकडील प्रभाग क्रमांक ०५ चे नगरसेवक श्रीप्रकाश जिलेदार सिंह उर्फ मुन्नासिंह यांनी सोमवार २१ डिसेंबर रोजी महापालिकेच्या पत्रकार कक्षामध्ये पत्रकार परिषद आयोजित करून कोरोनाच्या काळात महानगरपालिकेद्वारे चालविण्यात येत असलेल्या विलगीकर केंद्रात (कोरंटाईन सेंटर) नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या साहित्याच्या खरेदीमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याची पुराव्यानिशी माहिती उघड केली.
नगरसेवक मुन्नासिंह यांनी उपस्थित पत्रकारांना ठेकेदारांना अदा करण्यात आलेल्या बिलांच्या प्रति आणि इतर पुरावे व कागदपत्रांच्या प्रति दाखवून माहिती दिली कि ठेकेदाराने १० रुपयाचे साबण ३५ रुपयांत, ८९ रुपयाचे गुड नाईट १७५ रुपयांत, ५०-६० रुपयांची प्लॅस्टिकची बादली १५० रुपयांत १५ रुपयांची क्रीम ६७ रुपयांत तर ४०० रुपयांची पीपीई किट ७०० रुपयांत अशा प्रकारचे साहित्य १०० ते ७०० टक्के वाढीव दराने खरेदी केली असून महापालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याची माहिती दिली आहे.
नगरसेवक मुन्नासिंह यांनी आयुक्तांना दिलेल्या तक्रारीमध्ये आरोप केला आहे कि अलगीकरण केंद्रात वापरण्यात येणाऱ्या वस्तूंच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून अधिकतम किरकोळ विक्री मूल्य (MRP) पेक्षा वाढीव १०० ते ७०० टक्के दराने साहित्य खरेदी केल्याचे दाखवून सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि ठेकेदार यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे आणि या सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत महापौर ज्योत्सना हसनाले यांचेशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी देखील कोरोना सारख्या महाकठीण प्रसंगात देखील पालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार अशा प्रकारे भ्रष्टाचार करीत असल्याने या प्रकारा बाबत नाराजी व्यक्त केली असून या सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी आयुक्त डॉ. विजय राठोड यांचेकडे केली असल्याचे सांगितले आहे.
महानगरपालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी मात्र साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाला नसून लोकडाऊनमुळे सर्व वाहने बंद होती आणि पुरवठा बंद झाला होता त्यामुळे ठेकेदाराला काही काळापुरते वाढीव दराने साहित्य खरेदी करावा लागला मात्र नंतर मूळ दारातच साहित्य खरेदी केला असल्याचे थातुरमातुर उत्तर दिले असून लोकडाऊनचे नियम फक्त सामान्य नागरिकां करिता लागू होते परंतु अत्यावश्यक सेवा पुरविणारे शासकीय पुरवठादारानां वाहतुकीची किंवा इतर कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती मग या ठेकेदारांना अशा प्रकारे वाढीव दराने साहित्य खरेदी करण्याची गरज का लागावी? या प्रश्नावर मात्र त्यांनी काहीही बोलण्याचे टाळले आहे.
सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक श्रीप्रकाश जिलेदार सिंह उर्फ मुन्नासिंह यांनीच कोरोना सारख्या कठीण प्रसंगी देखील महापालिकेत होत असलेला हा भ्रष्टाचार उघडकीस आणल्यामुळे आता सत्ताधारी पक्ष भाजपाची चांगलीच गोची झाली असून आता त्यावर महापौर, उप महापौर काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. असे असले तरी आता मीरा-भाईंदर महानगरपालिका हि महा-भ्रष्टाचारी महानगरपालिका झाली असल्याचे बोलले जात असून शहरातील नागरिकां कडून संताप व्यक्त केला जात आहे.