संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्यात ‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. राजकारण तर आता चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी गंभीर व्हावं. राज्य आणि देशासमोर बेरोजगारीचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करून चालणार नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. राज्याच्या हितासाठी एकत्र यावं. सर्व पक्षीय प्रतिनिधींचं शिष्टमंडळ दिल्लीत न्यावं. पंतप्रधानांना भेटून आपला प्रकल्प परत आणावा असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.
तसेच राज्यातील अडीच ते तीन लाख रोजगाराचा प्रश्न आहे. त्यावर गांभीर्य व्हायला हवं. तळेगावला साईट पाहिली होती. सर्व तयारी झाली होती. मग अचानक काय झालं ? प्रकल्प गुजरातला का गेला त्याची जबाबदारी घ्या. सत्तेत बसणं म्हणजे नुसतच सत्कार घेणं. लाल दिवा बंद करून लोकांची गैरसोय करणं आणि गाड्यांचा सुसाट धावणारा ताफा नसतो. सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची संधी यालाच सत्ता म्हणतात असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
यावर ‘वेदांता ग्रुप’चे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातकडे वळली असल्याचा आरोप होत असतानाच कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांनी महाराष्ट्रामध्येही गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. रात्री सव्वा दहाच्या आसपास अनिल अग्रवाल यांनी ट्विटरवरुन ही घोषणा केली. हा प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय आधीच घेतला गेला असल्याचं अग्रवाल म्हणाले आहेत. अनिल अग्रवाल यांनी सोशल मिडियावरुन माहिती दिली आहे की, दोन वर्षांपासून वेगवेगळ्या राज्यातील सरकारशी करार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तसेच सर्वोत्तम डील त्यांना कोणत्या राज्याकडून मिळते यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. ते डील गुजरात सरकारकडून मिळाल्याचे अनिल अग्रवाल यांनी सांगितले.