संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे रशियातील भारतीय दूतावासात अनावरण कार्यक्रमात “कोणतीही व्यक्ती जन्माने नाही, तर कर्माने मोठी होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. स्वत:चे जीवन प्रताडित असतानासुद्धा त्यांनी इतरांच्या आयुष्यात आनंद फुलविला”, असे विचार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मॉस्कोत व्यक्त केले.
सकाळी मॉस्को स्टेट लायब्ररीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर सायंकाळी मॉस्कोतील भारतीय दूतावासातील भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या सांस्कृतिक केंद्रात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण केले. या कार्यक्रमाला विधानसभाध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, मिलिंद कांबळेंसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज एकाच दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना दुसऱ्यांदा मानवंदना अर्पित करण्याची संधी मला मिळाली, याचा अतिशय आनंद होत आहे. एक आठवण सांगताना ते म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या घराचा दरवाजा थोडा छोटा होता. लोक त्यांना विचारायचे की इतका लहान दरवाजा का ? त्यावर ते गंमतीने उत्तर द्यायचे, पंडित नेहरू जरी आले तरी त्यांना माझ्या घरात वाकून यावे लागेल. आज नेहरु सेंटरमध्येच त्यांच्या तैलचित्राचे अनावरण झाले, हा योगायोग
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे शिक्षण झाले नाही, त्यांना शाळेत जाता आले नाही. पण, आज त्यांच्या साहित्यावर अनेक विद्यार्थी पीएचडी करतात. त्यांची लेखणी इतरांना प्रेरणा देणारी ठरली. लेखणीने परिवर्तन, लेखणीने समाजाला धीर आणि त्याच लेखणीने लढण्याचे बळ असे काम त्यांनी केले. रशिया प्रवासाचे त्यांनी केलेले वर्णन खऱ्या अर्थाने यथार्थ होते. प्रवास वर्णन हे साधारणत: रंजक असते. पण, त्यातूनही प्रेरणा मिळणे, अशा पद्धतीचे वर्णन त्यांनी केले. प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदीजी यांच्या पाठिंब्यामुळे आजचे दोन्ही कार्यक्रम चांगल्या पद्धतीने झाले, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी इथे बोलताना सांगितले.