मीरारोड, प्रतिनिधी : मीरारोड पूर्वेकडील मीरा गावठण भागात राहाणाऱ्या शंभू जाधव नावाच्या इसमाचा गेल्या २६ ऑक्टॉबर रोजी त्याच्या राहत्या घरी संशयास्पद रित्या मृत्यू झाला. याबाबत त्याची पत्नी सुरेखा शंभू जाधव हिने काशिमीरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन माझ्या पतीचा खून झाला असून खून त्याचाच सख्खा भाऊ दीपक जाधव त्याची पत्नी गुलाब दीपक जाधव आणि आणखीन एक अनोळखी इसम या तिघांनी मिळून केला असल्याचा आरोप केला असून या प्रकरणाचा सखोल तपास करून दीपक जाधव आणि त्याचे साथीदार यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
याबाबत सुरेखा शंभू जाधव या तक्रारदार महिलेने दिलेल्या माहिती नुसार गेल्या २४ ऑक्टॉबर रोजी शंभू जाधव हा दारूच्या नशेत दीपक जाधव यांच्या घराच्या समोर धिंगाणा घालत होता आणि त्याच वेळी त्याने दीपक जाधव यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या दीपक जाधवच्या गाडीची काच फोडली. त्यानंतर दीपक जाधव त्याची पत्नी गुलाब जाधव आणि आणखीन एक अनोळखी इसम या तिघांनी मिळून शंभू जाधव याला लोखंडी रॉड आणि लाकडाच्या दांडक्याने अमानुष मारहाण केली आणि त्याला एका खोलीत कोंडून ठेवले. दोन दिवसांनी शंभू जाधव याचा त्याच खोलीतच मृतदेह आढळून आला.
दीपक जाधव याने पोलिसांना न कळविता किंवा त्याच्या मुलांना, पत्नीला देखील न कळवता किंवा त्याचे इतर नातेवाईक यांना देखील न कळविता शंभू जाधवचा अंतिम संस्कार देखील घाई-गडबडीत उरकून टाकला. मृतदेहाचा अंतिम संस्कार करण्यासाठी मृत्यूचा दाखल्याची आवश्यकता असते त्यासाठी दीपक जाधवने त्याच परिसरातील डॉक्टर पांडे यांच्याकडून शवविच्छेदन न करता मृत्यू दाखला बनवून घेतला आणि शंभू जाधवच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली असा आरोप केला असून माझ्या पतीचा खुनाचा झाला असल्याचा आरोप सुरेखा जाधव या तक्रारदार महिलेने केला आहे.
दीपक जाधव, शंभू जाधव आणि त्याचे मयत झाले दोन भाऊ असे एकूण चार भाऊ होते त्यापैकी दोन भावांच्या मृत्यू आधीच झाल्यानंतर त्यांच्या मीरा गावठण परिसरातील कोट्यवधी किमतीच्या त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेचे शंभू आणि दीपक हे दोघेच वारसदार होते. शंभू जाधव याला दारूचे व्यसन असल्यामुळे हि मालमत्ता एकट्यानेच हडपण्याचा दीपक जाधव हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत होता.
या मालमत्तेयावरून शंभू जाधव आणि त्याचा भाऊ दीपक जाधव या दोघांचे अनेक वेळा भांडण झाले होते आणि दीपक जाधवने शंभू जाधव याला यापूर्वी देखील अनेकवेळा मारहाण देखील केली होती दीपक जाधव हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे त्याचेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि म्हणूनच मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने माझ्या पतीचा काटा काढला आहे असा आरोप मयत शंभू जाधवची पत्नी सुरेखा जाधव हिने केला आहे.
शंभू जाधवच्या मुलाने लपून मृतदेहाचे फोटो काढले असून शंभू जाधव यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर स्वरूपात मारहाण केल्याच्या अनेक खुणा दिसत आहेत असे असून देखील आणि शंभू जाधवचा मृत्यू अनैसर्गिकपणे झालेला असून देखील अशोका क्लिनिकचे डॉक्टर पांडे यांनी शंभूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला का नाही? किंवा पोलिसांना देखील का कळविले नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जर अनैसर्गिक रित्या झाला असल्याचे दिसत असेल किंवा मृतकाच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा दिसत असतील तर डॉक्टरने त्याचा मृत्यू दाखला बनवून न देता ताबडतोब पोलिसांना कळवून त्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले पाहिजे असा नियम असताना देखील डॉक्टर पांडे यांनी घाई गडबडीत मृत्यू दाखला बनविला आणि त्याच आधारावर महापालिकेकडून दहन दाखला बनवून शंभू जाधवच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली असून शंभू जाधव हा त्याचा भाऊ दीपक जाधव, त्याची पत्नी गुलाब जाधव आणि त्यांचा साथीदार यांच्या मारहाणीमुळेच मरण पावला असून त्यांचे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काशिमीरा पोलीस ठाण्यात शुंभु जाधवची पत्नी सुरेखा जाधव हिचा तक्रार अर्ज दाखल करून घेतला असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत असून परिस्थितीजन्य पुरावे पाहूनच खुनाचा गुन्हा दाखल करायचा कि नाही हे ठरविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात सत्य काय ते पोलिसांच्या तपासानंतरच बाहेर येणार असले तरी एका व्यक्तीचा अनैसर्गिक अवेळी मृत्यू झाला आहे आणि म्हणून त्याच्या मृतात्म्याला न्याय मिळण्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.