मिरा भाईंदर प्रतिनिधी : एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सातत्याने बलात्कार करणाऱ्या एका ६० वर्षीय महाराजला नया नगर पोलिसांनी अटक केली आहे. मीरारोडमध्ये राहणारा हा महाराज मूळचा गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील आहे.
मिरारोड पूर्वेकडील महामार्गावर दीपक हॉस्पिटलच्या समोर असलेल्या पय्याडे हॉटेल मध्ये वेश्याव्यवसाय चालू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी मीरारोडच्या पय्याडे हॉटेलवर धाड टाकून वेश्यागमनसाठी आणलेल्या तीन पीडित मुलींची सुटका केली होती. त्यामध्ये एक १६ वर्षांची अल्पवयीन मुलगी देखील होती.
नया नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीची विचारपूस केली असता एका महाराज ने तिच्यावर अनेकदा बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले.
मिळालेल्या माहितीची पोलिसांनी खात्री केल्या नंतर त्या ६० वर्षीय महाराजला अटक केली आहे. सदर महाराज हा भगवे कपडे घालून पूजापाठ करण्यासाठी जात असे. त्याच्या राहत्या घरी सुद्धा त्याचा दरबार भरत असे. भक्तमंडळी त्याच्या घरी जाऊन सेवा देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या १५ वर्षांपासून हा महाराज शहरात बस्तान मांडून आहे. महाराजाच्या अवतारात हा ढोंगी असले अनैतिक प्रकार करत होता असे समोर आले आहे.
हा महाराज पीडित अल्पवयीन मुलीवर गेल्या अनेक महिन्यां पासून लैंगिक अत्याचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. नया नगर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या सह संबंधित कायदे कलम नुसार त्या महाराजवर गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी केली जात आहे.
लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन अशा प्रकारे हा महाराज गेल्या अनेक वर्षांपासून असे अनैतिक कृत्य करीत असल्याचे उघड झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.