संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
येत्या काळात महापालिका निवडणुकांची सर्वच पक्षांना प्रतीक्षा लागलेली असताना स्थानिक पातळीवर पक्षाला मजबुती देण्याचे प्रयत्न राज्यातील सर्वच पक्षांद्वारे करण्यात येत आहे. मनसेच्या गोटातून महत्वाची बातमी पुढे आली असून राज ठाकरे यांनी आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, याबाबतीत सूचना देखील त्यांनी सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना केल्या आहे.
नुकतीच मुंबईच्या रंगशारदा येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत पक्षप्रमुख राज ठाकरे यांची बैठक पार पडली यावेळी पुन्हा एकदा ‘एकला चलो रे’ अशी भूमिका राज यांनी मांडली. प्रसंगी मार्गदर्शन करताना विविध विषयांवर चर्चा देखील झाली तसेच सज्ज होण्याचा सल्ला मनसैनिकांना देण्यात आला. सध्याच्या राजकीय स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला, तसेच सध्याच्या व याआधीच्या सरकारला जनता वैतागली असून वेगळा पर्याय देण्यावर यावेळी चर्चा झाल्याचे समजते.
तुम्ही तुमचे कार्य करा विजयापर्यंत नेण्याची जबाबदारी माझी आहे असा ठाम विश्वास देखील यावेळी पदाधिकारी व राज्यभरातील कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी दिला. सध्या शिवसेना पक्षाचे विभाजन झाल्याने तसेच महाविकास आघाडी सरकार सत्तेबाहेर पडल्याने येत्या काळातील निवडणुकांमध्ये मनसेला यश गाठले अधिक कठीण जाईल, कारण भाजप तसेच शिंदेची बाळासाहेबांची शिवसेना एकीकडे तर दुसरी महविकास आघाडी असे कडवे आव्हान राज ठाकरेंच्या मनसेसमोर राहणार आहे.