संपादक: मोईन सय्यद/ प्रतिनिधी: मिलन शाह
डोंबिवली : काही दिवसांपूर्वी मुंबईतील साकीनाका याठिकाणी देशाला हादरवणारी महिला अत्याचाराची घटना घडली होती. येथील एका ३० वर्षीय महिलेवर अतिशय अमानुष पद्धतीने बलात्कार करून नराधमांनी तिची हत्या केली होती. ही घटना ताजी असताना, सामूहिक बलात्काराच्या घटनेनं मुंबई पुन्हा हादरली आहे. डोंबिवलीतील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल २९ जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मनपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत २३ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास मनपाडा पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना डोंबिवलीतील भोपर परिसरातील आहे. येथील एका अल्पवयीन मुलीवर तब्बल २९ जणांनी वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेवून सामूहिक बलात्कार केला आहे. नराधमांनी जानेवारी २०२१ पासून २२ सप्टेंबर २०२१ पर्यंत पीडितेला नरक यातना दिल्या आहेत. आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने काल रात्री मनपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी बलात्कारसह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत २३ संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. संबंधित सर्व आरोपींनी पीडितेला डोंबिवली, बदलापूर, मुरबाड, राबळे अशा विविध ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार केला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन आरोपी अल्पवयीन आहेत, बाकीचे सर्व आरोपी १८ वर्षांपुढील आहेत. पोलीस घटनेची गंभीरता ध्यानात घेऊन पुढील तपास करीत आहेत.