Latest News आपलं शहर क्रीडा जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

४० व्या कुमार-मुली ‘राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत’ महाराष्ट्राच्या मुलांची विजयी सलामी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भुवनेश्वर येथे दि.२२ सेप्टेंबर (क्री. प्र.), बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर २२ ते २६ सप्टेंबर दरम्यान भुवनेश्वर, ओडीसा येथे सुरू झालेल्या ४० व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कुमार-मुली खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनी सलामीच्या सामन्यात नागालँडवर ३२-६ असा १ डाव राखून २६ गुणांनी सहज विजय मिळविला.

सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात महाराष्ट्राकडून सूरज जोहरे, विवेक ब्राह्मणे व भगतसिंग वसावे यांनी प्रत्येकी ५ गडी टिपत महाराष्ट्रचा विजय सोपा केला. भगतसिंगने नाबाद १.५० तर सौरभ अहिरने २.३० मिनीटे संरक्षण करून विजयाची पायाभरणी केली. रवी वसावे (१.२०मिनिटे संरक्षण व २ गडी ) व आदित्य कुदळे (१.३० मिनिटे संरक्षण व ४ गडी) यांनी अष्टपैलू खेळ करताना मोठा विजय साजरा केला.

मुलींचा नागालँड संघ न आल्यामुळे मुलींच्या संघाला पुढे चाल मिळाली.

महाराष्ट्रचे संघ सोलापूरहून रेल्वेने रवाना झाले होते. तत्पूर्वी येथील ह.दे. प्रशालेत निरोप समारंभावेळी महाराष्ट्राचे कुमार व मुलींचे दोन्ही खो-खो संघ यंदा सुवर्ण पदक कायम राखतील, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केला होता.

उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या वतीने दोन्ही संघास शुभेच्छा दिल्या गेल्या. रामचंद्र जाधव मित्र परिवाराच्या वतीने खेळाडूंना किट बॅग देण्यात आल्या. त्यांच्या आणि राज्य शासकीय प्रशिक्षक सत्येन जाधव, ह.दे. प्रशालेचे हनुमंत मोतीबने, खो-खो असोसिएशनचे सचिव सुनील चव्हाण, खजिनदार श्रीरंग बनसोडे, दक्षिण तालुका खो-खो असोसिएशनचे तुळशीराम शेतसंदी, समृद्धी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संस्थापक अध्यक्ष संजय सावंत, रेल्वेचे जाकिर आत्तर, उमेश जाधव, उत्कर्ष क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष रविंद्र नाशिककर व खजिनदार उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते किट बॅग देण्यात आली. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे यांनी प्रस्ताविक केले. अजित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published.