संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
शिवसनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नेहमी कुठल्या ना कुठल्या प्रकरणाने चर्चेत असतात. नुकतीच काही दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटका झालेल्या संजय राऊतांची राजकारणातील सक्रियता पुन्हा पूर्वीप्रमाणे वाढली आहे, यावेळी कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद प्रकरणी देखील राऊतांनी काही विधाने केली होती. राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती, देसाईंच्या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊतांना फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने राजकीय वातावरणात एकच खळबळ निर्माण झाली आहे.
सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला असून कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राच्या वाहनांवर यापूर्वी दगडफेकीचे प्रकार घडले होते. कर्नाटक मधील कन्नड वेदिका संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक असून, संजय राऊतांना काल दोनदा फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला. दरम्यान शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेद्वारे संजय राऊतांना सज्जड दम देत म्हटले होते की, “आत्ताच जेलमधून सुटला आहात, पुन्हा जेल मध्ये जावं लागेल” त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शंभूराज देसाई यांच्या या विधानानंतर संजय राऊतांना फोन आल्याने देखील संशय अधिक वाढत चालला आहे.
राऊतांना धमकीचा फोन आल्याने कन्नड वेदिका संघटनेवर संशय व्यक्त करण्यात येत असून, सध्या याबतीत नेमका कुणाचा संबंध आहे हे निश्चित नाही. मात्र, येत्या काळात यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणि सीमावाद प्रकरण पुन्हा पेटण्याची दाट शक्यता आहे. संजय राऊत मागील काही दिवसांपासून सतत शिंदे-फडणवीस सरकारवर सीमावाद प्रकरण योग्यरीत्या हाताळल्या न गेल्याच्या टीका करत आहे, त्यामुळे त्यांना शांत राहण्याचा सल्ला शंभूराज देसाई यांनी दिला आहे. मात्र या दोन नेत्यांमध्ये वाद विकोपाला जाण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.