देश-विदेश

एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि अँपेक्स हॉस्पिटलच्या सहयोगाने नवीन कर्करोग उपचार केंद्र सुरू

मुंबई, प्रतिनिधी : मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणाऱ्या कर्करूग्णांना वेळीच उपचार मिळावेत, यासाठी एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि अँपेक्स हॉस्पिटलच्या सहयोगाने नवीन कर्करोग उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध असून सर्व प्रकाराच्या कर्करोगावर याठिकाणी उपचार दिले जाणार आहेत. यामुळे पश्चिम उपनगरात राहणाऱ्या लोकांना दुरवर उपचारासाठी करावी लागणारी पायपीठ आता कमी होऊन या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

कर्करोग हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आजार आहे. कर्करोग या आजाराला सायलेंट किलर असंही म्हटले जाते. कर्करोग हा विकार अनुवंशिक असू शकतो. त्याचप्रमाणे तंबाखू सेवन, धुम्रपानआणि व्हायरस इन्फेक्शन यांच्यामुळे कर्करोग होऊ शकतो.

एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार, २०१७ या वर्षापासून आतापर्यंत मुंबईत २५०४ कर्करूग्णांवर उपचार करण्यात आले आहे. यात १४२४ जणांना केमोथेरपी देण्यात आली आहे. याशिवाय पुरूषांमध्ये साधारणतः तोंडाचा, अन्ननलिका, पोट, कोलोरेक्टल आणि फुफ्फुसाचा कर्करोग सर्वांधिक आढळून येतो. तर महिलांमध्ये स्तन, गर्भाशयाच्या मुखाचा, डोके आणि मानेचा कर्करोग अधिक प्रमाणात दिसून येत आहे. पुरूषांमध्ये कर्करोगाचे प्रमाण ६० टक्के तर महिलांमध्ये हे प्रमाण ४० टक्के इतके आहे.

साधारणपणे १५-२० टक्के पुरूषांना तोंडाचा कर्करोग तर महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका सर्वाधिक असतो. उतारवयात कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. यात स्तनाचा, तोंडाचा, रक्ताचा, यकृताचा आणि गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो. २० ते ३० टक्के तरुणांमध्ये स्तनाचा आणि तोंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाले आहे. लहान वयात तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तरुणवयात या मुलांना कर्करोगाचा सामना करावा लागतो. याशिवाय स्त्रियांमध्ये कमी वयात स्तनाचा कर्करोग होण्यामागे अनुवांशिक घटक, हार्मोनल बदल, अल्कोहोलचे सेवन, लठ्ठपणा, चुकीची जीवनशैली आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही यामागील मुख्य कारणे आहेत.

डॉ. संजय शर्मा म्हणाले, “अपेक्स हॉस्पिटलच्या सहकार्याने हे केंद्र पश्चिम उपनगरातील कर्करोगाच्या रुग्णांसाठी सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या कर्करोगावर उपचार दिले जाणार आहे. केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी, तोंडाच्या कर्करोगासाठी लेसर शस्त्रक्रिया, तोंडावाटे आणि स्तनाच्या कर्करोगासाठी पुनर्रचना शस्त्रक्रिया, डोके आणि मान कर्करोगाच्या रूग्णांसाठी मायक्रोस्व्हुलर फ्लॅप शस्त्रक्रिया यासारखे उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहे. या रूग्णालयात मालाड ते विरार आणि गुजरात, सूरत आणि अहमदाबाद येथून रूग्ण उपचारासाठी येत आहेत. या शिवाय लवकरच केमोथेरपीसह सर्जिकल सेवा सुरू करणार आहोत.”

डॉ. धैर्याशील सावंत म्हणाले, “पूर्वी स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण ५-१० टक्के होते. तर मागील पाच वर्षात यात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या केंद्रात रूग्णाच्या स्थितीनुसार प्रत्येक वयोगटातील कर्करूग्णांसाठी इम्युनोथेरपी दिली जाणार आहे. डोके आणि मान, फुफ्फुस, मूत्रपिंड, मूत्राशय, यकृत किंवा स्तनाचा कर्करोग असलेल्या रूग्णांमध्ये इम्यूनोथेरपीचा वापर केला जाणार आहे. कर्करोगाचे वेळीच निदान व्हावे, यासाठी मॅमोग्राफी, अँन्टीजेन चाचणी, कोलोनोस्कोपी यांसारख्या कर्करोगावरील वैद्यकीय तपासणी करून घेण्यास नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाणार आहे.”

डॉ व्रजेश शाह म्हणाले, “कर्करोगाची लक्षणं पटकन करून त्यावर उपचार व्हावेत, यासाठी शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जेणेकरून वेळीच निदान झाल्यास रूग्ण कर्करोगातून लवकर बरा होऊ शकतो.”

Share :

Leave a Reply

Your email address will not be published.