मिरा-भाईंदर, प्रतिनिधी : मिरा-भाईंदर शहरातील अतिचर्चित महत्वाकांक्षि बीएसयुपी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल करून दोषीं आढळणारे मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील बडे अधिकारी आणि त्यांचे दलाल यांचेवर गुन्हे दाखल करणार असल्याचे आश्वासन मिरा-भाईंदर शहराच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी आज महानगरपालीकेच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले.
येत्या ०५ फेब्रुवारी रोजी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आरक्षण क्रमांक ३०० येथे भाजपचे जेष्ठ नेते स्व. प्रमोद महाजन यांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारण्यात येणारे कला दालनाचे भूमिपूजन त्याच बरोबर अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होणारे २३ मजल्यांपर्यंत पोहचण्याची क्षमता असणारे टर्न टेबल लॅडर (TTL) ह्या अत्याधुनिक वाहनांचे लोकार्पण त्याच बरोबर बीएसयुपी योजनेतील प्रलंबित १८ गाळे धारकांना त्यांच्या गाळ्यांच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत त्या संबंधित माहिती देण्याकरिता बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी बीएसयुपी योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नावर महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी वरील प्रमाणे आश्वासन दिले आहे.
शहरी भागातील दुर्बल घटकातील नागरिकांना पक्की घरे देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या बीएसयुपी योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या बेनामी सदनिका या योजनेत आहेत. एकाच पत्त्यावर एकाच परिवाराच्या सदस्यांच्या नावे अनेक सदनिका मंजूर करण्यात आलेल्या आहेत, महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी स्थानिक राजकीय नेत्यांच्या संगनमताने अनेक सदनिका बेनामी नावाने लाटल्या असून त्या खुल्या बाजारात आठ ते दहा लाखांत विकल्या जात आहेत अशा अनेक तक्रारी महापालिकडे करण्यात आलेल्या आहेत.
ज्या पात्र झोपडी धारकांना सदनिका वाटप केल्या आहेत त्या त्यांना न मिळता इतर लोकांनी लाटल्या आहेत, ट्रांसीट कैम्प मधील अनेक सदनिका देखील पात्र झोपडी धारकांना न देता इतर लोकांना भाड्याने देण्यात आलेल्या असून त्या सदनिकांचे दर महिन्याला आठ ते दहा हजार भाडे महापालिकेचे अधिकारी आणि दलाल घेत आहेत असे अनेक आरोप या योजनेच्या संदर्भात नेहमीच होत आलेले आहेत, त्या संदर्भात मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडे अनेक लेखी तक्रारी देखील करण्यात आलेल्या आहेत मात्र महापालिका प्रशासनाने या संदर्भात साधी चौकशी सुद्धा अजून केली नाही. दरवेळी आरोप केले जातात मात्र पुढे काहीच होत नाही! जे खरोखर पात्र झोपडी धारक आहेत त्यांना अजून घरं मिळाली नसून त्यांना तात्पुरत्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले असून गेली अनेक वर्षे ते नागरिक अक्षरशः नरक यातना भोगत आहेत मात्र त्याच ठिकाणी स्थानिक नेते, दलाल आणि महापालिका अधिकारी मात्र आपले उखळ पांढरे करून घेत असून या सर्व योजनेची सखोल चौकशी झाल्यास या योजनेतील अनेक भ्रष्टाचार बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महापौर ज्योत्सना हसनाळे यांनी पत्रकारांसमोर बीएसयुपी योजनेची सखोल चौकशी करून दोषी आढळणारे महापालिका अधिकारी, संबंधित ठेकेदार आणि दलाल यांचेवर गुन्हे दाखल करून त्यांचेवर कठोर कारवाई करू असे आश्वासन जरी दिले असले तरी या योजनेतील भ्रष्टाचारात महापालिकेचे बडे अधिकारी आणि स्थानिक राजकीय नेते यांचा सक्रिय सहभाग पाहता प्रत्यक्षात अशा प्रकारची कोणतीही चौकशी होईल का? याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे आणि महापौर खरोखरच या योजनेतील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्यात गांभीर्य दाखवतील का? हे तर येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार असले तरी आता हा भ्रष्टाचार जास्त काळ दाबून ठेवता येणार नसून या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा लागोपाठ करणार असल्याचे उपस्थित अनेक पत्रकारांनी बोलून दाखविले आहे.