संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून आज उल्हासनगर महानगरपालिकेबाहेर शिवसैनिकांनी भाजपा नगरसेवकाला काळे फासून चोप दिल्याची घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा उल्हासनगर मधील सेना-भाजपा वाद उफाळून आला आहे. आज उल्हासनगर मधील सात ते आठ शिवसैनिकांनी भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्या तोंडाला काळे फासत चांगलाच चोप दिला.
या हल्ल्याबद्दल रामचंदानी यांनी म्हटलं की उल्हासनगरचे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी हा हल्ला केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी, चौधरी यांच्या अनधिकृत बांधकामाबद्दल तक्रारी करत होतो. याचा राग मनात धरून हा हल्ला चौधरी यांच्या माणसांनी केला आहे.
उल्हासनगर मध्ये नारायण राणेंवर टीका करताना सेनेच्या ‘या’ आमदाराची जीभ घसरली
दरम्यान, प्रदीप रामचंदानी यांनी केलेल्या आरोपाबद्दल राजेंद्र चौधरी यांना विचारलं असता त्यांनी अनधिकृत बांधकाम कोण करत आहे हे सर्वांना माहीत असून, प्रदीप हे ‘सोशल मीडिया’वर शिवसेनेची अनेकदा बदनामी करत असतात. तसेच नारायण राणें यांनी केलेल्या वक्तव्यावर आज आम्ही राणेंच्या पिलावळी शोधतच होतो, तेव्हा महानगरपालिकेबाहेर शिवसैनिकांना रामचंदानी भेटले आणि त्यांना शिवसेना स्टाईल मध्ये उत्तर दिलं आहे. असे, राजेंद्र चौधरी म्हणाले.
आता या मारहाण प्रकरणी उल्हासनगर मधील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात प्रदीप रामचंदानी यांच्या फिर्यादीवरून सात ते आठ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे मध्यवर्ती पोलीस स्टेशन कडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.