संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी
भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांचेवर झालेल्या गोळीबारामुळे अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असला तरी या प्रकरणामुळे अधिकाऱ्यांचेच पितळ उघडे पडण्याची शक्यता जास्त असल्याचे बोलले जात आहे.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत यांच्या गाडीवर घरी जाताना बोरिवली नॅशनल पार्क, कृष्णा बिल्डिंगच्या समोर ओंकारेश्वर मंदिराजवळ गोळीबार झाला होता. मोटारसायकल वरून आलेल्या दोन अज्ञान इसमांनी हा गोळीबार केला असल्याची माहिती मिळाल्या नंतर मुंबई पोलीस उपायुक्तांसह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. तर या प्रकरणाचा समांतर तपास मिरा भाईंदर पोलीस देखील करत आहेत.
दरम्यान हा हल्ला कोणी केला? कसा केला? आणि का केला? याचा पोलीस अधिक तपास करत असताना मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी डॉ. महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपासाची चक्रे फिरवून उत्तर प्रदेश येथून एका आरोपीला अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून त्या आरोपीला विमानातून मुंबईला घेऊन आले असून त्याला पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांकडे सोपविण्यात येणार आहे.
या सगळ्या प्रकरणाची सत्यता काय ती लवकरच सगळ्यांच्या समोर येणार असली तरी पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत. तपासाचा भाग म्हणून कार्यकारी दीपक खांबीत यांच्या मोबाईल फोनचे सगळे कॉल डिटेल्स तपासून पाहत असून त्यामुळे अनेक भन्नाट माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंत्रालयात बसणारे आणि महापालिका प्रशासनातील हे बडे बडे अधिकारी कुणा कुणाशी बोलतात? त्यांचे कुणा कुणाशी संबंध आहेत? त्यांचे कुणाशी आर्थिक व्यवहार आहेत? त्यांच्या बेनामी संपत्ती कुठे कुठे आहे? त्यांचे कुणाशी अनैतिक संबंध आहेत का? ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता असून दीपक खांबीत गोळीबार प्रकरणामुळे अनेक बड्या अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दीपक खांबीत आपले दिवसभराचे काम संपवून त्यांच्या कारने बोरिवली येथील घरी जात असताना सायंकाळी बोरिवली येथे महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली असताना आणि अत्यंत गर्दीच्या ठिकाणी अचानक गोळीबार करण्यात आला होता. हा गोळीबार पैशाच्या व्यवहारातून झाला? की खंडणीसाठी केला गेला? की या प्रकरणात आणखीन काही वैयक्तिक कारण होते? हे लवकरच जगासमोर येणार असले तरी या प्रकरणाचे गांभीर्य आणि अनेकांची पोलखोल होईल या दृष्टीने पाहता या प्रकरणाचे खरे आरोपी आणि खरी माहिती समोर येईल की नाही शंका व्यक्त केली जात आहे.