संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
गेल्या कित्येक महिन्यांपासून महागाईमुळे जनतेचे कंबरडे मोडले असून, रोजच्या वापरातील जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्य जनता हवालदिल झाल्याचे दृश्य आहे. जीएसटीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार काही बदल करताना अनेक नव्या बाबींचा जीएसटी अंतर्गत समावेश केल्याने महागाईचे चटके सामान्य जनतेला आता रोजचीच बाब बनली आहे. सध्या सणासुदीचा काळ असल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे, अशातच सगळ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला असून, याअंतर्गत खाद्यतेलाचे दर १० ते १२ रुपायांनीं कमी होणार आहे.
खाद्यतेलाचे प्रक्रियाकर्ते व निर्मिती करणाऱ्यांनी जागतिक स्तरावर झालेल्या खाद्यतेलाच्या दरातील घट याचा नेमका फायदा ग्राहकांना देण्याची तयारी दशविली आहे, त्यामुळे आगामी काळात ऐन सणासुदीला खाद्यतेल १२ रुपायांनीं स्वस्त होणार आहे. दरम्यान रशिया-युक्रेनचे युद्ध व इंडोनेशियने इतर देशांमध्ये पामतेलाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने तेल दराच्या महागाईचा भडका उडाला होता. भारत खाद्यतेलासोबत तेलबियाण्यांचे आयात करणारा प्रमुख देश आहे, सुमारे दोन तृतीयांश इतके खाद्यतेल व तेलबियाणे भारतात आयात करण्यात येते.
केंद्र सरकारने तेल वितरकांना खाद्यतेल किंमती कमी करण्याचा सल्ला दिला असून, जर खाद्यतेल उत्पादक किंमती कमी करत असेल तर मूळ तेल किंमत कमी करण्यात याव्या, याबाबत सरकार आदेश जारी करणार असून आगामी सणासुदीच्या काळात १२ रुपयांपर्यंत तेलांच्या दरात घट अपेक्षित आहे. याचा फायदा जनतेला त्वरित दिला जाणार असून सध्याच्या पॅकिंग तेलावर एमआरपी पेक्षा कमी नवे दर लागू करण्याचा बदल लवकरच केला जाणार आहे. एकंदरीतच यामुळे सामान्य लोकांच्या खिशाला बसणारी झळ आता कमी होणार असून, सणासुदीला याचा फायदा त्यांना नक्कीच होईल.