मुंबई, प्रतिनिधी: माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी कृषीविज्ञान प्रतिष्ठानचा अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा राज्यस्तरीय ‘राजीव गांधी कृषिरत्न’ पुरस्कार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार सय्यद मुझफ्फर हुसैन यांना जाहीर झाला आहे.
सेंद्रीय शेती व नाविन्यपूर्ण शेती प्रयोग विभागांतर्गत हा पुरस्कार मिळाला आहे. विदर्भ, मराठवाडा दुष्काळी भागातील अल्पभूधारक, शेतकरी व शेती व्यवसाय अडचणीत येत असल्याने कमी भांडवल, कमी खर्चात शेती करून शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करून शेती व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादन वाढीसाठी बहुमोल मार्गदर्शन कार्य मुझफ्फर हुसैन करीत आहेत. गेल्या १६ वर्षांपासून हे प्रतिष्ठान शेतकरी, शेतमजूर, शेतीशी निगडित प्रशासकीय अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ यांच्या कार्याचा गौरव करीत आहे. खासदार स्व. राजीव सातव यांनी ही संकल्पना प्रथम अमलात आणली होती.
अमरावती जिल्ह्यातील प्रगतिशील व प्रयोगशील शेतकऱ्यांची निवड शेतकरी निवड समितीच्या अध्यक्षा पौर्णिमा ताई सवाई यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्काराची घोषणा केली आहे. या समितीमध्ये डॉ. दिलीप काळे अविनाश पांडे, अनील ठाकरे, भैय्यासाहेब निचळ, प्रा. अमर तायडे, प्रा. हेमंत डिके, मिलिंद फाळके, जावेद खान, नामदेव वैद्य, जयसिंगराव देशमुख आदींचा समावेश आहे. २१ मे ते २८ मे या कालावधीत सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा त्या त्या ठिकाणी जाऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सेंद्रिय शेती व नाविन्यपूर्ण शेती प्रयोग, प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी, महिला शेतकरी, फळबाग उत्पादक, गाव कारभारी सरपंच, उत्कृष्ट बैलजोडी मालक, कृषीवैज्ञानिक, पशुसंवर्धन,पशु वैद्यकीय संशोधन, उत्कृष्ट दूध उत्पादक, कृषी पत्रकारिता आदी विविध क्षेत्रातील मान्यवर लोकांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार असल्याचे राजीव गांधी कृषीविज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी सांगितले.
सदर पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये डॉ. श्याम देशमुख (पशुवैद्यकीय संशोधन) राणीताई भांडारे (गावकारभारी सरपंच), प्रवीण बारी( फळबागायतदार ), सुयोग गोरले (कृषी पत्रकारिता), अनुप बगाडे ( प्रयोगशील शेतकरी), संगीता ताई दुधे( उत्कृष्ट महिला शेतकरी), विजय भुयार ( उत्कृष्ट दूध उत्पादक), मे. अजिंक्यतारा शेतकरी उत्पादक कंपनी चा समावेश आहे.
सदर पुरस्कार 21 मे रोजी राजीव गांधी पुण्यतिथी दिवशी अस्मिता फार्म, सत्रापुर, ता. रामटेक, जि. नागपूर येथील फार्म हाऊसवर प्रत्यक्ष जाऊन मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत मुझफ्फर हुसैन यांना प्रदान करण्यात येणार असून मुझफ्फर हुसेन यांना कृषिरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.