Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या

‘ईडी’कडून अनिल देशमुखांची ४ कोटी नव्हे, तर तब्बल ३५० कोटींची मालमत्ता जप्त..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ‘ईडी’ने ४ कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती काल समोर आली होती. पण ‘ईडी’ने जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत ही ३५० कोटी रुपये इतकी असल्याची नवी माहिती आता समोर आली आहे. ‘ईडी’ने काल अनिल देशमुख यांच्याशी संबंधीत दोन मालमत्ता जप्त केल्या आहेत. ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी या मालमत्तेची किंमत ४ कोटी २० लाख असल्याचं म्हटलं होतं. पण ही किंमत खरेदीची किंमत आहे. या मालमत्तेची आजच्या बाजार भावाची किंमत तब्बल ३५० कोटी रुपयांच्या आसपास आहे.

अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ‘ईडी’ने मनी लाँन्ड्रिगचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात ‘ईडी’ने अनिल देशमुख यांना तीनदा चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. तर त्यांचा मुलगा ऋषिकेश याला एकदा समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र, दोघेजण चौकशीसाठी हजर न राहता चौकशी टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेले आहेत. त्यानंतर ‘ईडी’ने अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनाही समन्स बजावलं होतं. त्यांनी ही हजर न राहता आवश्यक ती कागदपत्रे ‘ईडी’ला सादर केली आहेत.

या सर्व घडामोडींनंतर आता ईडीने अनिल देशमुख यांची मालमत्ता जप्त करायला सुरुवात केली आहे. ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी काल अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन मालमत्ता जप्त केल्या आहेत. ‘ईडी’ने वरळी येथील एक फ्लॅट जप्त केला आहे. त्याची खरेदीच्या वेळची किंमत १ कोटी ५४ लाख रुपये आहे. तसेच अनिल देशमुख यांच्याशी संबंधित जमीनही जप्त करण्यात आली आहे.

‘ईडी’ने देशमुखांची रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील धुमत गावातील ८ एकर ३० गुंठे जमीन जप्त करण्यात आली आहे. ही जमीन मोक्याच्या ठिकाणी आहे. उरण पोर्ट आणि पळस्पे फाटा दरम्यान ही जमीन आहे. संबंधित जमीन ही नव्याने सुरु होत असलेल्या नवी मुंबई विमानतळापासून काही अंतरावर आहे. मोक्याच्या ठिकाणी ही जमीन असल्याने तिचा भाव प्रचंड आहे. या ठिकाणी एका गुंठ्याचा भाव एक कोटी रुपये आहे. अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांची भागीदारी असलेल्या प्रीमियर पोर्ट लिंक प्रायव्हेट लीमिटेड या कंपनीने ही जमीन रोख रक्कम देऊन २००४ ते २०१५ या काळात विकत घेतली आहे. त्याकाळात त्यांनी ही जमीन २ कोटी ६७ लाख रुपयांना विकत घेतली आहे. ८ एकर ३० गुंठे म्हणजे एकूण ३५० गुंठे जमीन झाली. प्रत्येकी एक कोटी रुपये गुंठा इतकी किंमत असल्याने या जमिनीची किंमत सुमारे ३५० कोटी रुपये होते.

मुंबईतील काही बार मालकांनी आपण सचिन वाझे याला पैसे दिल्याचं म्हटलं आहे. ही रक्कम ४ कोटी ७० लाख रुपये आहे. हीच रक्कम अनिल देशमुख यांना मिळाली असावी आणि रक्कम त्यांनी अशा पद्धतीने मनी लाँन्ड्रिग केली असावी, असा ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांना संशय आहे. त्यामुळेच ‘ईडी’च्या आधिकाऱ्यांनी ४ कोटी ७० लाख रुपयांच्या बदल्यात खरेदी किंमत असलेली ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मात्र, जप्त केलेल्या या मालमत्तेची प्रत्यक्षात बाजार भावाने किंमत ३५० कोटी रुपये आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात कथित १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले आहेत. याच प्रकरणाचा तपास सध्या ‘ईडी’कडून सुरु आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *