संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील एकाच मंचावर नुकतेच एकत्र आले होते, यावेळी या दोन्ही मंत्र्यांनी तुफान टोलेबाजी करत वातावरण निर्मिती केली प्रसंगी अनेक जणांना हसू अनावर झाले. प्रसंग होता सिल्लोड येथील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनाचा यावेळी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील एकत्रित या कार्यक्रमाला हजर होते.
या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आपले मत व्यक्त करताना गुलाबराव पाटील यांनी रावसाहेब दानवे तसेच भाजपला उद्देशून सुरुवातीला म्हटले होते की, “अडीच वर्षांपूर्वी आमची भाजपसोबत युती तुटली होती, लव्ह मॅरेज तुटलं होतं. परंतू योगायोगाने पुन्हा जुळून आलं. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे तसेच मिश्किल भाष्य करण्याच्या शैलीमुळे प्रसिद्ध असणाऱ्या रावसाहेब दानवेंनी देखील गुलाबराव पाटलांच्या या वक्त्यव्याला तितकेच साजेसे प्रत्युत्तर दिले.
यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, ”गुलाबराव आपलं ‘लव्ह मॅरेज’ नव्हतं ‘अरेंज मॅरेज’ होतं, ‘लव्ह मॅरेज’ तर तुम्ही त्यांच्यासोबत केले होते. ‘लव्ह मॅरेज’ करताना तुम्ही ज्या खाणाखुणा केल्या होत्या त्या मला कळाल्या होत्या.” अशाप्रकारे टोला दानवेंनी गुलबराव पाटलांना लगावला व जमलेल्या लोकांना हसू अनावर झाले.
प्रसंगी गुलाबराव पाटलांनी आजवर शिवसेनेसाठी केलेल्या कार्याच्या आठवनींना उजाळा दिला, तसेच टीका करणाऱ्यांसाठी अनेक सवाल देखील उपस्थित केले. पाठीवर दफ्तर असताना पासून आपण शिवसैनिक असल्याचे मत देखील यावेळी त्यांनी व्यक्त केले. एकंदरीतच राजकीय टोलेबाजीने रंगलेला हा भूमिपूजनाचा कार्यक्रम जनतेचे चांगलेच मनोरंजन करणारा ठरला.