Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

अनेक वर्षांपासून रखडलेल्या अधिकाऱ्यांची पदोन्नती झाल्यामुळे “कहीं खुशी, कहीं गम” सारखी अवस्था!

मिरा भाईंदर: तब्बल अठरा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिरा भाईंदर महापालिकेच्या दहा कनिष्ठ अभियंत्यांना शाखा अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्याच बरोबर अग्निशमन विभागाचे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी प्रकाश बोऱ्हाडे, दिलीप रणवरे, धनंजय कनोजे यांना देखील अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे मात्र आणखीन चार अभियंत्यांना पदोन्नती पासुन वंचित राहावे लागले आहे. इतर सहा अभियंत्यांचे न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असून त्यांची विभागीय चौकशी देखील सुरू असल्यामुळेच त्यांना पदोन्नती देण्यात आलेली नसल्याचे बोलले जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून महानगर पालिकेने सेवा ज्येष्ठता यादीच अद्ययावत केली नसल्यामुळे अनेक अधिकारी कर्मचऱ्यांची पदोन्नती रखडलेली होती. मिरा भाईंदर महानगर पालिकेचे एकूण १६ कनिष्ठ अभियंते २००४ सालापासून राज्य शासनाकडून कायम स्वरूपी विविध विभागात कार्यरत असताना सेवा प्रवेश नियमानुसार ३ वर्षानंतर त्यांना शाखा अभियंता पदावर वाढीव वेतनश्रेणी देऊन पदोन्नती देणे आवश्यक होते. परंतु २०१४ साली मिरा भाईंदर महानगर पालिकेचे सेवा प्रवेश राज्य शासनाने मंजूर केल्यामुळे त्या सेवा प्रवेश नियमानुसार त्यांना सेवेत रुजू झाल्यानंतर सर्व कनिष्ठ अभियंत्यांना ८ वर्षांनंतर उपअभियंता पदावर पदोन्नती देण्याची तरतूद करण्यात आलेली होती.

पात्र ठरत असलेल्या अभियंत्यांची संख्या जास्त आणि मंजूर पदांची संख्या कमी असल्यामुळे नेमकी पदोन्नती कुणाला द्यायची? हा प्रश्न निर्माण झालेला होता. त्यामुळे सर्वच १६ कनिष्ठ अभियंत्यांना महापालिका पदोन्नती देण्याचे टाळत होती. या प्रश्नावर आयुक्त दिलीप ढोले वेगळाच तोडगा काढला असून १० पात्र अभियंत्यांना उप अभियंता पदावर पदोन्नती न देता शाखा अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या नियमानुसार महापालिका आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंत्यांना दर तीन वर्षांनी उपअभियंता पदावर पदोन्नती देण्याची तरतूद आहे. याच धर्तीवर शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग व ग्राम विकास विभागाच्या सर्व जिल्हा परिषदामध्ये कार्यरत असलेल्या अभियंत्यांना तात्काळ पदोन्नती देण्यात आलेली होती. मात्र याला मिरा भाईंदर महानगरपालिका मात्र अपवाद ठरलेली आहे. महापालिका आस्थापनेवरील काही अभियंत्यांचे ४५ वर्ष वय पूर्ण झालेले असून त्यांना उप अभियंता पदावर पदोन्नती न देता महापालिकेच्या शाखा अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आलेली असल्यामुळे एका अर्थाने त्यांच्यावर अन्यायच झाला असल्याचे बोलले जात आहे.

मंगळवार २६ एप्रिल रोजी महापौर दालनात मिरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले व महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या हस्ते १० कनिष्ठ अभियंता व तीन अग्निशमन अधिकाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश देण्यात आले.

ज्या १० कनिष्ठ अभियंत्यांना शाखा अभियंता पदावर पदोन्नती दिली आहे. त्यामध्ये शिरिषकुमार पवार, प्रांजल कदम, सतीश तांडेल, राजेंद्र पांगळ, अरविंद पाटील, भुपेश काकडे, उत्तम रणदिवे, उमेश अवचर, सचिन पाटील आणि यतीन जाधव यांची नावे आहेत. त्याच प्रमाणे अग्निशमन विभागाचे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी प्रकाश बोऱ्हाडे, दिलीप रणवरे, धनंजय कनोजे यांना अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आली.

यावेळी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, पालिका आयुक्त दिलीप ढोले, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त मारुती गायकवाड यांच्यासह शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी दिपक खांबीत इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published.