संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे असं म्हणत सर्वपक्षीयांनी त्यांच्यावर टीका केली आहे. भाजपनंही त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नसल्याचं म्हटलं आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांचं वक्तव्य त्यांचं वैयक्तिक आहे. त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. मराठी माणसांमुळे मुंबई, महाराष्ट्राला वैभव प्राप्त झालं आहे. राज्यपाल हे मोठं पद आहे. एक संविधानिक पद आहे, कुणाचाही अवमान होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यायलाच हवी. मराठी माणसांचं योगदान कुणालाही नाकारता येणार नाही. मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली आहे, असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठी माणसांचं योगदान कुणालाही नाकारता येणार नाही. १०६ हुतात्म्यांनी या मुंबईसाठी बलिदान दिलं आहे. मराठी माणसांमुळं मुंबईला वैभव मिळालंय. राज्यपालांनी काही खुलासा याबाबत केला आहे. पण त्यांनी कुणाचा अवमान होणार नाही, याची काळजी त्यांनी घेतलीच पाहिजे, असंही ते म्हणाले. मुंबईत इतर राज्यातील लोकंही रोजगार मिळवतात, मात्र ते मुंबईच्या असलेल्या महत्वामुळं मिळत असतं. त्याचा अवमान कुणालाही करता येणार नाही. मुंबईवर अनेक प्रसंग आले, अनेक संकटं पाहिली. पण संकटकाळातही मुंबई थांबली नाही. करोडो लोकांनी मुंबई रोजगार देतेय, त्यामुळं असं अवमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही, असं राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावारील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिलेल्या त्यांच्या प्रतिक्रियेत म्हणाले.