प्रतिनिधी, अवधुत सावंत : सध्या एन.आय.ए च्या कोठडीत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची मे. विशेष न्यायालयाने ३ एप्रिल पर्यंत पुन्हा एन.आय.ए च्या कोठडीत रवानगी केली आहे.
या प्रकरणात एन.आय.ए ने आत्तापर्यंत केलेल्या तपासातील काही मुद्दे न्यायालयात ठेऊन त्यासंदर्भात पुढील तपास करण्यासाठी सचिन वाझे यांची कोठडी मागितली होती. एनआयएची ही मागणी न्यायालयाने मान्य केली.
यावेळी सचिन वाझेंकडच्या बेहिशेबी ६२ बुलेट्स, वाझे-हिरेन भेटीचे पुरावे अशा अनेक गोष्टी एन.आय.ए ने न्यायालयासमोर ठेवल्याचं वृत्त दिलं आहे.
‘सचिन वाझे यांच्या घरी अशा ६२ बुलेट्स सापडल्या, ज्यांचा कोणताही हिशोब त्यांच्याकडे नव्हता. तसेच, त्यांना सर्व्हिस रिव्हॉल्व्हरसाठी देण्यात आलेल्या ३० बुलेट्सपैकी फक्त ५ बुलेट्स सापडल्या असून उरलेल्या २५ बुलेट्स कुठे गेल्या, हे वाझेंना माहीत नसल्याचं एन.आय.ए ने कोर्टात नमूद केल्याचं’ या वृत्तात म्हटलं आहे.
तसेच, ‘१७ फेब्रुवारी रोजी मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांची भेट झाल्याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत, याच वेळी मनसुख हिरेनने सचिन वाझेंना कारची चावी दिली, जी चोरीला गेल्याचा दावा त्यांनी नंतर केला होता’, असं देखील एन.आय.ए ने यावेळी न्यायालयाला सांगितलं.
एन.आय.ए ने डीएनए टेस्टसाठी मनसुख हिरेन यांचे रक्ताचे नमुने घेतले असून या प्रकरणात सापडलेल्या गाड्यांमधून देखील नमूने गोळा करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणात अजून नवीन गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.