संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या आमदारांचा शपथविधी सोहळा नुकताच काही दिवसांपूर्वी पार पडला असून शपथ घेणाऱ्यांमध्ये अनेक जुन्या मंत्र्यांचा समावेश होता. नव्या मंत्रिमंडळामध्ये कुणाची वर्णी लागते, याबाबत सर्वांना उत्सुकता होती. या मंत्रिमंडळात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना संधी दिली जाईल असा अंदाज होता, परंतू त्यांना डावलण्यात आल्याने अनेक जणांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पंकजा मुंडे यांनी सावध भूमिका घेतली होती व यावर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले होते, परंतू रक्षाबंधन निमित्त राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर राखी बांधण्याकरिता पंकजा मुंडे यांच्याकडे आले असता प्रसार माध्यमांनी मुंडे यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी मंत्रिमंडळात स्थान न देण्याचा प्रश्न उपस्थित केला असता पंकजा यांनी मनातील नाराजी व्यक्त केली. यावेळी त्या म्हणाल्या की, “पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिले नसेल, मात्र जेव्हा वाटेल तेव्हा ते देतील” अशा प्रकारे मुंडे यांनी पक्षश्रेष्ठी व नेतृत्वावर निशाणा साधला.
पुढे संजय राठोड यांना मंत्रिपद दिल्याबाबत पंकजा यांचे मत जाणण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला असता, ज्यांनी राठोड यांना मंत्रिपद दिले त्यांनाच प्रश्न विचारा यावर मी काय बोलणार असे सावध उत्तर त्यांनी दिले. एकंदरीतच मंत्रीमंडळातून डावल्याबाबत पंकजा यांची नाराजी स्पष्ट दिसून येत होती.