संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
रोज 100 नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस..
विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन..
ठाणे येथीललसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांची कोणतेही गैरसोय होवू नये यासाठी ठाण्यात विवियाना मॉलच्या पार्किंगमध्ये ‘ड्राइव्ह इन’ लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला असून ऑनलाईन नोंदणी केलेल्या ६० वर्षांवरील नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. येत्या दोन दिवसात हे केंद्र कार्यान्वित करण्यात येणार असून या केंद्रावर रोज नोंदणी केलेल्या केवळ १०० ज्येष्ठ नागरिकांनाच सकाळी १० ते १ या वेळेत लस देण्यात येणार आहे.
शहरात लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर शहरातील जेष्ठ नागरिकांसाठी ‘ड्राइव्ह इन’ सुविधा सुरू करण्याच्या सूचना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने ही सुविधा सुरू करण्यात येत आहे. या संदर्भात महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतखाली काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सर्व पदाधिकारी, महापालिका आयुक्त आणि सर्वपक्षीय गटनेते यांच्या बैठकीतही चर्चा झाली होती.
या लसीकरण केंद्रामध्ये गाड्यांना येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात येणार असून आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेडस लावण्यात येणार आहेत. त्यामुळे बाहेर कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच लसीकरणानंतर निरीक्षणासाठीही पार्किंगमध्येच व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.
लसीकरण केंद्रांवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुविधा, अर्ध्या तासाच्या विश्रांतीसाठी व्यवस्था आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था केली जाणार आहे. ही सुविधा ६० वर्षांवरील नागरिकांसाठीच असून लसीकरणाची ऑनलाइन नोंदणी, तसेच लसीकरणाला येताना सोबत चालक आणि आणखी एक काळजीवाहक म्हणून एक व्यक्ती सोबत असणे आवश्यक आहे.