Latest News आपलं शहर महाराष्ट्र

आजपासून उत्तन येथील अरबी समुद्रातील खडकांवर दीपस्तंभ सुरू – खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्याला यश

संपादक: मोईन सय्यद / मिरा भाईंदर, प्रतिनिधी

भाईंदर पश्चिमेकडील उत्तन येथील अरबी समुद्रातील खुट्याची वाट येथील दीपस्तंभ आज पासून सुरु झाले. याचे उद्घाटन खासदार राजन विचारे यांच्या हस्ते अरबी समुद्रामध्ये करण्यात आले. त्यावेळी आमदार गीता जैन, जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख राजू भोईर, विरोधीपक्ष नेते प्रवीण पाटील, गटनेत्या व महिला शहर संघटक नीलम धवन, उपशहर संघटक तेजस्वी पाटील, शहर प्रमुख लक्ष्मण जंगम, पप्पू भिसे, बर्नाड डिमेलो, उप शहर प्रमुख केशीनाथ पाटील, अशोक मोरे, नगरसेवक एलियस बांड्या, हेलन जॉर्जी गोविंद, शर्मिला बगाजी, माजी नगरसेवक जॉर्जी गोविंद, स्थानिक मच्छीमार संस्थेचे पदाधिकारी, मॅक्सी व इतर शिवसैनिक पदाधिकारी व स्थानिक मच्छिमार, मेरिटाइम बोर्डाचे अभियंता शेलार, नायब तहसीलदार नंदकुमार देशमुख इत्यादी उपस्थित होते.

भाईंदर पश्चिमेकडील उत्तन किनारपट्टीवर अनेक मच्छीमारांचा पारंपारिक व्यवसाय मासेमारी हा आहे. ते आपली उपजीविका समुद्रात मासेमारी करून चालवितात. अनेक मासेमारी करणारे छोटे-मोठे मच्छीमारांच्या आपल्या स्वतःच्या बोटी आहेत. या उत्तन किनारपट्टीवर मासेमारी करून येत असताना खुंट्याची वाट या खडकावर पूर्वी एक दीपस्तंभ होता तो गेल्या अनेक वर्षापासून कोसळून पडल्याने बंद होता. त्यामुळे या खडकावरती अनेक मच्छीमारांच्या बोटी आदळून त्यांच्या बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायचे. खासदार राजन विचारे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना दि. 5 जुलै 2019 रोजीला पत्र देऊन दीपस्तंभासाठी 56 लाखाची परवानगी मेरिटाईम बोर्डाला मिळवून दिली होती. परंतु या ठिकाणी काम करण्याकरिता तांत्रिक अडचणी व अपुऱ्या निधीमुळे याचे काम सुरू करणे शक्य होत नव्हते. या साठी पुन्हा जिल्हाधिकारी व ठाणे जिल्हा पालकमंत्री पालकमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन याकामासाठी आवश्यक लागणारा 16 लाखाचा वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. या कामासाठी खासदार राजन विचारे यांनी एकूण 72 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. त्यासाठी अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग यांचीही भेट घेऊन दालनात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मेरीटाईम बोर्ड कडून हे काम जलद गतीने मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. या कामाचे भूमिपूजन दि. 15 मार्च 2021 रोजी करण्यात आले होते. याचे काम दोन महिन्यात पूर्ण करून येथील अनेक मच्छिमारांना दिलासा मिळाला आहे. तसेच या ठिकाणी कातल्याची वाट, वाशी खडक, सऱ्याची वाट या तीन खडकांवर दीपस्तंभासाठी निधी उपलब्धतेसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यांनी या कामासाठी आवश्यक लागणारा निधी उपलब्ध करू असे खासदार राजन विचारे यांना आश्वासन दिले आहे. यासाठी त्यांनी मेरिटाइम बोर्डाला या तिन्ही खडकांच्या प्रस्ताव तातडीने सादर करावे असे आदेश पत्राद्वारे करण्यात आले आहे.

खासदार राजन विचारे यांनी या कामासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब तसेच ठाणे जिल्हाधिकारी यांचेही आभार मानले आहेत.

तसेच या उत्तन परिसरात मच्छीमारांसाठी नवीन मच्छी मार्केट, बर्फ कारखाना, कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी त्याचबरोबर मच्छिमारांना पालघर येथील मत्स्यव्यवसाय विभागाच्या कार्यालयात जावे लागते हि त्यांची गैरसोय दूर व्हावी यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाचे कार्यालय उत्तन येथे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे खासदार राजन विचारे यांनी सांगितले आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *