Latest News गुन्हे जगत

उल्हास नगर पोलीस स्टेशन च्या हद्दीत घर वाटणीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

घर वाटणीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून केल्याची खळबळजनक घटना उल्हासनगर (कॅम्प नंबर १) परिसरातील भीमनगर येथील हिम्मत चौकात घडली आहे. खून करणाऱ्याला उल्हासनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घर वाटणीच्या वादातूनच सख्ख्या भावाचा डोक्यात लोखंडी पाईप घालून भर रस्त्यात खून करणाऱ्या भावाला उल्हासनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संतोष पांडुरंग कदम असे ताब्यात घेतलेल्या भावाचे नाव आहे. तर, विठ्ठल पांडुरंग कदम असे खून झालेल्या भावाचे नाव आहे. दोघा भावांमध्ये आईचे घर वाटणीवरून बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. मृत विठ्ठल हे कल्याण पश्चिम परिसरातील योगीधाम परिसरात कुटुंबासह राहत होते. तर, आरोपी संतोष हा कल्याण तालुक्यातील म्हारळगावात राहतो. या दोघांची आई जनाबाई ह्या उल्हासनगर (कॅम्प नंबर १) परिसरातील घरात राहतात. येथील घराच्या वाटणीवरून दिनांक १९ मे रोजी आरोपी संतोष याने आई राहत असलेल्या घरावर हक्क सांगत दारू पिऊन वाद केला होता. यामुळे कल्याणला राहत असलेल्या विठ्ठलने घरी जाऊन संतोषची समजूत काढली होती. दरम्यान, संतोषने विठ्ठलला तुला बघून घेईन अशी धमकी दिली होती. आईचे घर आपल्या वाटणीत येत नसल्याचे पाहून आरोपी संतोषने विठ्ठलला मारहाण करण्याचा कट रचला होता.

दरम्यान, काल रात्री विठ्ठल काही कामासाठी उल्हासनगर (कॅम्प नंबर १) परिसरातील भीमनगर येथील हिम्मत चौकात आला होता. दरम्यान, संतोषणे विठ्ठलचा पाठलाग करत, येथील चौकातच लोखंडी पाईपने त्याला मारहाण केली. यामध्ये विठ्ठल गंभीर जखमी झाला. त्यानंतर विठ्ठलला जखमी अवस्थेत रुग्णालय दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान विठ्ठलचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत विठ्ठलचा मुलगा विशाल (वय २४) याच्या फिर्यादीवरून संतोषवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर पोलिसांनी संतोषला अटक केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक एस. एस. गोरे करत आहेत.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *