संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
बँकेतील बचत खात्यात भरपूर पैसे असलेल्या खातेदारांची माहिती काढून त्याच्या खाते क्रमांकाचे बोगस चेक तयार करून त्या खात्यातून दुसऱ्या बोगस खात्यात पैसे जमा करून घेऊन ते पैसे मौज मजेसाठी वापरणाऱ्या एका टोळीच्या हातात मानपाडा पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने देशभरात असे फसवणुकीचे गुन्हे केले असल्याचे समोर आले आहे.
सचिन प्रकाश साळस्कर (२९ वर्षे, रा. विरार), उमर फारूक (३९ वर्षे, रा. विरार), अनेक अनिल ओतारी (३३ वर्षे, रा. विरार), मजहर मोहम्मद हुसेन खान (४० वर्षे, रा. विरार), हरिश्चंद्र काशिनाथ कडव (रा. वांगणी), नितीन दिलीप शेलार (४० वर्षे, रा. वांगणी) आणि अशोक बिहारीराम चौधरी (५१ वर्षे, रा. महेश अपार्टमेंट, गोग्रासवाडी, नामदेव पथ, डोंबिवली (पूर्व) अशी या टोळीतील सात जणांची नावे आहेत.
या संदर्भात हाती आलेल्या माहितीनुसार एचडीएफसीच्या कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या दावडी शाखेचे मॅनेजर विशाल रामप्रसाद व्यास (४५ वर्षे) यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी भादंवि कलम ४६७,४६८,४६९,४२०,५११,३४ अन्वये ऑक्टोबर २०२१ रोजी गुन्हा दाखल केला होता. या घटनेची चौकशी करताना भावेश नावाचा गृहस्थ बँकांमधील मोठ्या खात्यांच्या माहिती या टोळीस देत. त्यानंतर ही टोळी तेच खाते क्रमांक असलेला बोगस चेक तयार करून त्या ग्राहकांची तंतोतंत जुळणारी सही करत असे. तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक या राज्यामध्ये देखील अशा प्रकारची चोरी करत असल्याची कबुली या टोळीने दिली आहे. आतापर्यंत या आरोपींनी ५० पेक्षा जास्त बोगस चेक्स बनविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अप्पर आयुक्त दत्तात्रय कराळे , उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक उपयुक्त जे. डी. मोरे मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे पोलीस ठाण्याचे जमादार सुरेंद्र शिंदे, दीपक जगदाळे यांनी या गुन्ह्याची उकल केली आहे.
विशेष म्हणजे वपोनि शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीकृष्ण गोरे, विरार पोलिस ठाण्याचे जमादार सुरेंद्र शिवदे, दिपक जगदाळे यांनी केलेल्या तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, हे आरोपी टीम वर्कने काम करतात. यात खातेधारकांचे बँक डिटेल्स गोळा करणे, त्यावर असणारा बॅलन्स, खातेधारकाच्या सहीचे फोटो, वगैरे माहिती घेत असत. त्यानंतर त्या माहितीच्या आधारे बोगस चेक बनवण्याचे काम करत असत. एक साधा चेक घेऊन त्यावरील खातानंबर खोडून, नवीन खातानंबर प्रिंट केला जाई. जमविलेल्या माहितीच्या आधारे मग त्यावर डुप्लिकेट सही केली जात असे. त्यानंतर हा चेक वापरून अकाऊंट टू अकाऊंट पैसे पाठविले जात असत. पैसे ट्रान्सफर करून घेण्यासाठी देखील डमी अकाऊंटचाच वापर केला जात असे. अशाप्रकारे या सात जणांनी मिळून आतापर्यंत कित्ती कंपन्या, बँका आणि व्यक्तींची अशारितीने फसवणूक केली आहे याचा सपोनि श्रीकृष्ण गोरे अधिक तपास करत आहेत.