प्रतिनिधी: मिलन शाह, लोणी काळभोर, पुणे –
बेरोजगार असल्यामुळे एका तरुणाने पत्नी आणि मुलाचा खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कदमवाक वस्ती परिसरात रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
हनुमंत दर्याप्पा शिंदे (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पत्नी प्रज्ञा हनुमंत शिंदे (वय २८) तिचा गळा दाबून तर मुलगा शिवतेज हनुमंत शिंदे (वय १ वर्ष २ महिने) याचा सुरीने गळा कापून खून केला.
याप्रकरणी दर्याप्पा अर्जुन शिंदे यांनी फिर्याद दिली असून लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबीय मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. कामधंद्यासाठी मागील काही महिन्यांपासून ते कदमवाक वस्ती परिसरात आले होते. येथील एका घरात ते भाड्याने राहत होते. मागील काही दिवसांपासून काम नसल्यामुळे हनुमंत शिंदे बेरोजगार होता. यामुळे त्याला नैराश्य आले होते. याच नैराश्यातून त्याने रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास हे भयानक कृत्य केले. पत्नी आणि लहान मुलाचा खून केल्यानंतर त्याने राहत्या घरात बेडरूममधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.